मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २०२० साली आदर्श आचारसंहितेचे उल्लंघन केले, पण त्याविरोधात केलेल्या तक्रारीवर कारवाई करण्यास राज्य निवडणूक आयोगाने टाळाटाळ केली आहे. आचारसंहितेचा भंग केल्याचे आयोगाने मान्य करत केवळ रेल्वे प्रशासनाला समज दिली, पण मोदींवर कारवाई केलेली नाही. तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी व शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्यावर कठोर कारवाई करण्यात आली होती. कायद्यापेक्षा कोणीही मोठे नाही, मग नरेंद्र मोदींवर आयोग कारवाई का करत नाही? असा प्रश्न विचारूरन याप्रकरणी उच्च न्यायालयात दाद मागणार असल्याचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी सांगितले.
ते पुढे म्हणाले, डिसेंबर २०२० रोजी सोलापूर जिल्ह्यातील सांगोला मतदारसंघात पंतप्रधान नरेंद्र मोदी, तत्कालीन रेल्वे मंत्री, कृषिमंत्री यांनी सांगोला ते पश्चिम बंगालमधील शालिमार या किसान रेल्वेच्या १०० व्या गाडीचा शुभारंभ केला. यावेळी महाराष्ट्रात ग्रामपंचायत निवडणुका व पश्चिम बंगालमध्ये विधानसभेच्या निवडणुका सुरू होत्या. यासाठी निवडणूक आयोग व जिल्हा प्रशासन यांची परवानगी घेतली नव्हती. याविषयी प्रफुल्ल कदम या कार्यकर्त्याने निवडणूक आयोगाकडे तक्रार केली असता सुरुवातीला वेळकाढूपणा करण्यात आला, पण शेवटी आचारसंहिता भंग झाल्याचे मान्य करत केवळ रेल्वे प्रशासनाला समज देण्यात आली, असे चव्हाण म्हणाले.


