मुंबई: मंत्र्यांची वादाची प्रकरणे समोर येऊन त्यातून सुरू असलेल्या शह-कटशहांच्या डावपेचांतून शिवसेनेची कोंडी होत असल्याचे चित्र बाहेर येत असतानाच उपमुख्यमंत्री तथा शिवसेना मुख्य नेते एकनाथ शिंदे बुधवारी अचानक दिल्ली दौऱ्यावर गेले. या दौऱ्याबाबत राजकीय वर्तुळात तर्कवितर्काना उधाण आले असून महायुतीतील इतर पक्षांमध्ये हा दौरा चर्चेचा विषय ठरला आहे.
महायुतीत धुसफूस झाली, महायुतीतील विशेष करून शिवसेनेच्या मंत्र्यांवर आरोप झाले की शिंदेंनी यापूर्वी दिल्ली वारी केली आहे. आताही काही मंत्र्यांबाबत वाद सुरू असताना ते दिल्लीत गेले आहेत. ते कोणाकोणाला भेटतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. दरम्यान, सर्वोच्च न्यायालयात शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण चिन्हाचा खटला सुरू आहे. त्यावरील सुनावणीच्या पार्श्वभूमीवरही कायदेशीर चर्चेसाठी हा दौरा असल्याचे सांगण्यात येत आहे. कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांचा अधिवेशनात सभागृहात पत्ते खेळतानाचा व्हिडीओ व्हायरल झाल्याने त्यांच्या राजीनाम्याची मागणी जोर धरू लागली होती. परंतु मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मंत्री कोकाटे यांना संधी देत राजीनामा घेतला नाही.
चर्चेला उधाण
राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत तर अजित पवार यांनी शिंदे सेनेच्या वादग्रस्त मंत्र्यांचा राजीनामा घ्यावा, नंतर माझ्या मंत्र्यांचा निर्णय घेईन, अशी अट टाकल्याची चर्चा आहे. यामुळे महायुतीतील अशा कोंडीपासून वेळीच वाचण्यासाठी शिंदे दिल्लीला गेल्याचाही तर्क लावला जात आहे.


