मुंबई: राज्याचे उपमुख्यमंत्री तथा राज्याचे अर्थमंत्री अजित पवार आज (10 मार्च) राज्याचा अर्थसंकल्प सादर केला. त्यांनी अनेक मोठ्या घोषणा केल्या. सर्वांचे लक्ष लागलेल्या लाडकी बहीण योजनेबाबतही अर्थमंत्री अजित पवारांनी घोषणा केली.
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेंतर्गत सुमारे 2 कोटी 53 लाख लाभार्थी महिलांना गेल्या वर्षीच्या जुलै महिन्यापासून आर्थिक लाभ देण्यात येत आहे. त्यासाठी आतापर्यंत 33 हजार 232 कोटी रुपये खर्च झाला आहे. सन 2025-26 मध्ये या योजनेकरीता एकूण 36 हजार कोटी रुपये प्रस्तावित करण्यात आले आहेत. या योजनेतून मिळणाऱ्या अनुदानाचा उपयोग काही महिला त्यांच्या आर्थिक उपक्रमासाठी बीज भांडवल म्हणून केला आहे. अशा गटांना आणखी प्रोत्साहन देण्यासाठी विशेष योजना हाती घेण्याचे विचाराधीन असल्याचे अर्थमंत्री अजित पवारांनी सांगितले.
मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेसाठी आतापर्यंत 23 हजार 232 कोटी खर्च झाला असून राज्यातील 2 कोटी 53 लाख महिलांना लाभ मिळाला. तर 2025-26 या वर्षासाठी 36 हजार कोटींची तरतूद करण्यात आली आहे. मुख्यमंत्र्यांनी अर्थसंकल्पाच्या वेळी 2100 रुपये देऊ असे म्हटले होते. तुम्ही जे 2100 रुपये देणे मान्य केलेत, ते येणाऱ्या अर्थसंकल्पातून देणार का? असा प्रश्न उपस्थित करण्यात येत होता. परंतु, या अर्थसंकल्पात लाडकी बहीण योजनेसाठी गेल्यावर्षी जी तरतूद करण्यात आली, तेवढ्याच रकमेची तरतूद 2025-26 वर्षासाठी करण्यात आली आहे. त्यामुळे लाडक्या बहीणींना यावर्षी 2100 रुपये मिळणार नाही, हे स्पष्ट झाले आहे.


