पुणे: पुण्यात राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) चे नेते राजेंद्र हगवणे यांची सून वैष्णवीने हुंड्याच्या छळामुळे आत्महत्या केली. २०२५ मध्येही हुंड्याची घृणास्पद प्रथा अजितदादांच्या पक्षातील लोक चालवत आहेत, हे अत्यंत लाजीरवाणे आहे. एकीकडे महिलांना लाडकी बहीण म्हणून १५०० रुपये द्यायचे आणि त्यांच्याच पक्षातील नेते हुंड्याची मागणी करतात, हे अत्यंत नीच मानसिकतेचे प्रदर्शन आहे, अशा शब्दांत मनसेच्या नेत्या शालिनी ठाकरे यांनी हुंडा या सामाजिक समस्येवर बोट ठेवताना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या पुरोगामीपणावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. या प्रकरणी मनसे नेत्या शालिनी ठाकरे यांनी राष्ट्रवादीच्या नेत्या आणि महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर यांच्यावर जोरदार टीका केली आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते राजेंद्र हगवणे यांच्या सुनेने गळफास घेऊन आत्महत्या केल्याच्या घटनेमुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. वैष्णवी शशांक हगवणे (वय-२३) असे मृत महिलेचे नाव असून, हुंड्यासाठी सासरच्या मंडळींनी तिचा छळ केल्याने तिने आत्महत्या केल्याचा आरोप तिच्या कुटुंबीयांनी केला आहे. मुळशी तालुक्यातील भुकूम येथे १६ मे रोजी ही घटना घडली. या प्रकरणी मनसे नेत्या शालिनी ठाकरे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. तर, याच वेळी शालिनी ठाकरे यांनी महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर यांच्या भूमिकेवरही प्रश्नचिन्ह उपस्थित केले. त्या म्हणाल्या, एरवी चित्रपटात एखादा बोल्ड सीन आला की बंदी आणि कारवाईची मागणी करणाऱ्या महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर आता कुठे आहेत? या प्रकरणी महिला आयोगाने तातडीने कारवाई करावी आणि जनजागृती मोहीम राबवावी, अशी माझी मागणी आहे. या प्रकरणी कठोर कारवाई झालीच पाहिजे, अशी मागणीही ठाकरे यांनी केली आहे.
या प्रकरणात पोलिसांनी शशांक राजेंद्र हगवणे (पती), राजेंद्र तुकाराम हगवणे (सासरे), लता राजेंद्र हगवणे (सासू), करिश्मा राजेंद्र हगवणे (नणंद) आणि सुशील राजेंद्र हगवणे (दीर) यांच्याविरोधात आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल केला आहे. ठाकरे यांच्या टीकेवर आता चाकणकर काय भूमिका मांडतात, हे पाहावे लागणार आहे.


