Pandharpur VIP Darshan: पंढरपूरच्या विठ्ठल-रुक्मिणी मंदिरात येणाऱ्या सर्वसामान्य भाविकांसाठी एक अत्यंत सुखावणारी बातमी आहे. मंदिर प्रशासनाने व्हीआयपी (VIP) दर्शनावर तात्पुरती बंदी घातल्यामुळे, आता रांगेत ताटकळत उभे राहणाऱ्या थेट वारकऱ्यांना विठ्ठलाच्या गाभाऱ्यात शांतपणे दर्शन घेण्याची सुवर्णसंधी मिळत आहे. “आज इतक्या वर्षांत पहिल्यांदाच विठ्ठलाची खरी भेट झाली,” अशा भावूक प्रतिक्रिया दर्शनानंतर भाविकांच्या मुखातून उमटत आहेत.
अधिकमासामुळे पंढरीत भाविकांचा पूर
सध्या सुरू असलेल्या पवित्र पुरुषोत्तम (अधिक) मासामुळे पंढरपुरात दररोज लाखो भक्तांची माउलींच्या दर्शनासाठी मांदियाळी पाहायला मिळत आहे. आषाढी वारीसारखेच विहंगम दृश्य सध्या पंढरीत असून, दररोज साधारण ७ ते ८ लाख भाविक पंढरपुरात दाखल होत आहेत. या अथांग गर्दीचे नियोजन करण्यासाठी मुख्यमंत्री आणि पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी व्हीआयपी दर्शन व्यवस्था पूर्णपणे थांबवण्याचा कडक निर्णय घेतला. या निर्णयाची काटेकोर अंमलबजावणी सुरू होताच मंदिरातील चित्र पूर्णपणे बदलले आहे.
नेमका काय झालाय बदल?
यापूर्वी देवाच्या महापूजा आणि नित्योपचाराच्या वेळी विशिष्ट अतिमहत्त्वाच्या (VIP) व्यक्तींनाच देवासमोर बसून पूजेचा आनंद घेता यायचा. आता त्याच जागेवर सामान्य वारकऱ्यांना बसवून देवाचे रूप डोळ्यात साठवण्याची संधी दिली जात आहे. अनेक वर्षांपासून वारी करणाऱ्या ज्येष्ठ वारकऱ्यांनी सांगितले की, “तासन्तास रांगेत उभे राहूनही यापूर्वी कधी गाभाऱ्यात एवढा वेळ शांतता मिळाली नव्हती. हा निर्णय आमच्यासारख्या गरिबांसाठी देवाघरचा प्रसादासारखा आहे.”
दर्शनाचा वेळ घटला, रांगांचा वेग वाढला
व्हीआयपी संस्कृतीला चाप लावल्यामुळे केवळ व्हीआयपी जागाच मोकळी झाली नाही, तर संपूर्ण मंदिर परिसरातील गोंधळ कमी झाला आहे. प्रशासनाच्या या कौतुकास्पद निर्णयामुळे संपूर्ण वारकरी संप्रदायातून आणि महाराष्ट्रातील भाविकांमधून समाधान व्यक्त केले जात आहे.


