Dharashiv News : धाराशिव जिल्ह्यात विद्यार्थ्यांच्या अभ्यासासाठी एक अभिनव आणि चर्चेचा विषय ठरणारा उपक्रम राबवला जाणार आहे. वाढत्या मोबाईल आणि टीव्हीच्या वापरामुळे मुलांचे शिक्षण बिघडत असल्याच्या पार्श्वभूमीवर जिल्हा परिषदेने हा निर्णय घेतला आहे.
या उपक्रमानुसार, दररोज संध्याकाळी ७ ते ९ या वेळेत संपूर्ण जिल्ह्यात दोन तास टीव्ही आणि मोबाईल बंद ठेवले जाणार आहेत. या वेळेची सूचना देण्यासाठी गावागावात भोंगा वाजवला जाणार असून तो विद्यार्थ्यांसाठी ‘अभ्यासाची घंटा’ ठरणार आहे.
जिल्हा परिषद अध्यक्षा अर्चना पाटील यांनी दिलेल्या माहितीनुसार, या उपक्रमात जिल्ह्यातील सुमारे ७६० ग्रामपंचायतींचा सहभाग असणार आहे. तसेच प्रत्येक गावासाठी एका अधिकाऱ्याची नियुक्ती करून या निर्णयाची अंमलबजावणी काटेकोरपणे केली जाणार आहे.
याशिवाय, या दोन तासांच्या काळात विशेष पथक गावांमध्ये गस्त घालणार आहे. घरोघरी जाऊन टीव्ही बंद आहेत का आणि विद्यार्थी अभ्यास करत आहेत का, याची खातरजमा केली जाणार आहे. केवळ कागदावर निर्णय न राहता प्रत्यक्षात अंमलबजावणी व्हावी यासाठी प्रशासनाने ही पावले उचलली आहेत.
तसेच जिल्हा परिषद शाळांमध्ये पुन्हा सेमी-इंग्लिश पॅटर्न लागू करण्याबरोबरच वाचन संस्कृती वाढवण्यासाठी विशेष मोहीमही राबवली जाणार आहे.
या उपक्रमाबाबत पालकांनीही सहकार्य करावे, असे आवाहन अर्चना पाटील यांनी केले आहे. मुलांच्या उज्ज्वल भविष्यासाठी दोन तास टीव्हीपासून दूर राहणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले.
या निर्णयाचे शैक्षणिक क्षेत्रातून स्वागत होत असले, तरी घराघरातील टीव्ही बंद करण्याच्या सक्तीवर नागरिकांची प्रतिक्रिया काय असेल, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.


