Ashok Kharat : नाशिकमधील भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणात रोज नवे धक्कादायक खुलासे होत असून काल रात्री या प्रकरणात नाट्यमय घडामोडी घडल्या. एसआयटी पथक खरातच्या घरी पोहोचण्यापूर्वीच त्याची पत्नी कल्पना खरात फरार झाली, तर मुलगा हर्षवर्धन खरात याला पोलिसांनी ताब्यात घेतले.
अशोक खरातची पोलीस कोठडी आज संपत असून त्याला नाशिक जिल्हा न्यायालयात हजर करण्यात येणार आहे. त्याच्याविरोधात लैंगिक शोषण आणि आर्थिक फसवणुकीसह अनेक गंभीर गुन्हे दाखल झाले असून तक्रारींचा आकडा वाढतच आहे. त्यामुळे एसआयटीकडून त्याची कोठडी वाढवण्याची मागणी केली जाणार आहे.
तपासात सहकार्य न केल्यामुळे आता खरातची चौकशी मुलासमोर करण्याची तयारी पोलिसांनी केली आहे. त्याच्याकडून अधिक माहिती मिळवून फरार असलेल्या पत्नीचा शोध घेण्यावर तपास यंत्रणेचा भर आहे.
दरम्यान, एसआयटीने या प्रकरणात खरातचा चार्टर्ड अकाउंटंट, ईशान्यश्वर मंदिराचा पुजारी आणि एका सराफ व्यावसायिकाचीही कसून चौकशी केली आहे. आर्थिक व्यवहार आणि मंदिराशी संबंधित बाबींची सखोल तपासणी सुरू आहे.
आज कोर्टात सुनावणीदरम्यान एसआयटीकडून महत्त्वाचे पुरावे सादर करून पुन्हा पोलीस कोठडी मिळवण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. त्यामुळे या प्रकरणातील पुढील घडामोडींवर सर्वांचे लक्ष लागले आहे.


