Ashok Kharat : नाशिकमधील स्वयंघोषित बाबा आणि बलात्काराचा आरोपी अशोक खरात प्रकरणात दररोज धक्कादायक खुलासे होत असून आता या प्रकरणाला आंतरराष्ट्रीय स्वरूप येण्याची शक्यता व्यक्त होत आहे. तपासात खरात हवाल्याच्या माध्यमातून परदेशात, विशेषतः दुबईपर्यंत पैशांची देवाणघेवाण करत असल्याची माहिती समोर आली आहे.
खरातविरोधात आतापर्यंत एकूण १० गुन्हे दाखल झाले असून त्यामध्ये ८ लैंगिक अत्याचार आणि २ फसवणुकीचे गुन्हे आहेत. विशेष तपास पथक (SIT) या संपूर्ण प्रकरणाचा सखोल तपास करत असून अनेक बडे अधिकारी आणि तथाकथित भक्त त्याला मदत करत असल्याचेही उघड झाले आहे.
तपासात असेही समोर आले आहे की, अंकशास्त्र आणि भविष्य सांगण्याच्या बहाण्याने खरातने १५० हून अधिक महिलांना जाळ्यात ओढत त्यांचे लैंगिक शोषण केले. या प्रकरणातील पीडित महिलांच्या जबाबांमधून अनेक धक्कादायक बाबी समोर येत आहेत.
अलीकडेच दाखल झालेल्या नव्या गुन्ह्यांमध्ये एका महिलेला “मी महादेवाचा अवतार आहे” असे सांगत धमकावून तिच्यावर अत्याचार केल्याचा आरोप आहे. तसेच दुसऱ्या प्रकरणात नेवासा येथील एका व्यावसायिकाची लाखो रुपयांची फसवणूक केल्याचे समोर आले आहे. व्यवसाय वृद्धीसाठी विविध अंगठ्या देण्याच्या बहाण्याने त्याच्याकडून मोठी रक्कम उकळण्यात आली.
दरम्यान, या संपूर्ण प्रकरणात आर्थिक व्यवहार, हवाला रॅकेट आणि आंतरराष्ट्रीय कनेक्शन यामुळे तपास अधिक गुंतागुंतीचा होत चालला आहे. SIT कडून सखोल चौकशी सुरू असून येत्या काळात आणखी मोठे खुलासे होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.


