Anjangaon News : सोलापूर जिल्ह्यातील माढा तालुक्यातील अंजनगाव येथे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यावरून सुरू असलेला वाद अखेर मिटला आहे. गेल्या काही दिवसांपासून या मुद्द्यावरून गावात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. मात्र प्रशासन, लोकप्रतिनिधी आणि दोन्ही समाजाच्या प्रतिनिधींमध्ये झालेल्या बैठकीत तोडगा निघाल्याने गावात दिलासा मिळाला आहे.
नेमकं प्रकरण काय?
अंजनगावातील खेलोबा देवस्थानाच्या जागेत अचानक शिवाजी महाराजांचा पुतळा बसवण्यात आल्याने वादाची ठिणगी पडली होती. ही जागा देवस्थानाची असल्याचा दावा समोर आल्यानंतर दोन समाजांमध्ये मतभेद निर्माण झाले होते. हा वाद वाढत जात असल्याने प्रशासनाने तातडीने हस्तक्षेप करत सर्व संबंधितांना एकत्र आणले.
या पार्श्वभूमीवर पालकमंत्री जयकुमार गोरे, कोल्हापूर परिक्षेत्राचे आयजी सुनील फुलारे, जिल्हाधिकारी कार्तिकेयन, पोलिस अधीक्षक अतुल कुलकर्णी, माजी आमदार राजन पाटील तसेच मराठा समाजाच्या प्रतिनिधींची महत्त्वाची बैठक आयोजित करण्यात आली. या बैठकीत सर्व बाजूंचा सखोल विचार करून अखेर सर्वानुमते निर्णय घेण्यात आला.
बैठकीत ठरल्याप्रमाणे, ज्या जागेवर सध्या पुतळा बसवण्यात आला आहे ती जागा खेलोबा देवस्थानाची असल्याचे मान्य करण्यात आले. त्यामुळे हा पुतळा तेथून हलवून ग्रामस्थ आणि मराठा समाजाने पसंती दिलेल्या नवीन जागेवर स्थलांतरित करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यासाठी प्रशासन आणि स्थानिक प्रतिनिधी मिळून योग्य जागेची पाहणी करणार आहेत.
याशिवाय, नव्या ठिकाणी पुतळा उभारणी आणि परिसर सुशोभीकरणासाठी तब्बल एक कोटी रुपयांचा निधी पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी तातडीने मंजूर केला आहे. जिल्हाधिकारी आणि पोलिस अधीक्षक गावात फिरून ग्रामस्थांच्या सहकार्याने अंतिम जागा निश्चित करणार आहेत.
दरम्यान, या वादामुळे गावात जातीय तणाव वाढला होता. मंदिराचे पुजारी फरांडे महाराज यांनी या मुद्द्यावर आमरण उपोषण सुरू केले होते. त्यांनी तीन दिवसांपासून अन्नत्याग केला होता. मात्र तोडगा निघाल्यानंतर आता वातावरण निवळण्याची शक्यता आहे.
या निर्णयामुळे अंजनगावातील तणाव कमी होऊन गावात शांतता प्रस्थापित होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.


