West Bengal Political Crisis: पश्चिम बंगालमधील विधानसभा निवडणुकांच्या निकालानंतर राज्याच्या राजकारणात अभूतपूर्व उलथापालथ झाली आहे. माजी मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांना एकाच दिवशी दोन अत्यंत मोठे धक्के बसले असून, तृणमूल काँग्रेस पक्षाला (TMC) मोठी गळती लागली आहे. पक्षातून हकालपट्टी करण्यात आलेले नेते ऋतब्रत बॅनर्जी यांनी तब्बल ६० आमदारांना सोबत घेत स्वतंत्र गट स्थापन केला असून, विधानसभा अध्यक्षांनीही या गटाला अधिकृत मंजुरी दिली आहे. या राजकीय पेचातच ममता बॅनर्जींचे पुतणे आणि खासदार अभिषेक बॅनर्जी यांच्या निवासस्थानावर अंमलबजावणी संचालनालयाने (ED) छापा टाकल्याने खळबळ उडाली आहे.
८० पैकी ६० आमदार बंडखोरांच्या छावणीत; ममतांकडे उरले अवघे २०
पक्षनेतृत्वाने ऋतब्रत बॅनर्जी आणि संदीपन शाह यांची हकालपट्टी केल्यानंतर तृणमूल काँग्रेसमधील अंतर्गत कलह उफाळून आला. अभिषेक बॅनर्जी यांच्या कार्यपद्धतीवर तीव्र आक्षेप घेत ऋतब्रत बॅनर्जी यांच्या नेतृत्वाखाली आमदारांनी बंडाचे निशाण फडकावले. ऋतब्रत बॅनर्जी यांनी ५८ आमदारांच्या स्वाक्षऱ्यांचे पत्र आणि अन्य दोन आमदारांचा पाठिंबा असे एकूण ६० आमदारांचे संख्याबळ विधानसभा अध्यक्षांसमोर सादर केले.
अध्यक्षांनी या संख्याबळाची दखल घेत बंडखोर गटाला मान्यता दिली असून ऋतब्रत बॅनर्जी यांची ‘विरोधी पक्षनेते’ म्हणून नियुक्ती केली आहे. या बंडामुळे ८० पैकी ६० आमदार फुटल्याने ममता बॅनर्जी यांच्याकडे आता केवळ २० आमदारांचे संख्याबळ शिल्लक राहिले आहे. महाराष्ट्रात शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये घडलेल्या नाट्यमय घडामोडींचीच पुनरावृत्ती आता बंगालमध्ये पाहायला मिळत आहे.
अभिषेक बॅनर्जी यांच्या घरावर ‘ईडी’ची धडक
एकीकडे पक्षात उभी फूट पडलेली असतानाच, ममता बॅनर्जी यांचे पुतणे अभिषेक बॅनर्जी यांच्यासमोरील अडचणीतही मोठी वाढ झाली आहे. ‘ईडी’च्या चार वेगवेगळ्या पथकांनी आज अचानक अभिषेक बॅनर्जी यांच्या निवासस्थानी धडक देत तपास सुरू केला आहे. या पथकांकडून त्यांची कसून चौकशी केली जाण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. राजकीय सत्ता गमावल्यानंतर एकाच वेळी पक्षातील मोठे बंड आणि कुटुंबातील सदस्यांमागे लागलेला केंद्रीय तपास यंत्रणांचा ससेमिरा, यामुळे ममता बॅनर्जी आणि त्यांच्या पक्षाची कोंडी झाली असून बंगालचे राजकारण संपूर्णपणे ढवळून निघाले आहे.


