HSRP Number Plate: हाय सिक्युरिटी नंबरप्लेट (HSRP) न बसवणाऱ्या वाहनांवर दंडात्मक कारवाईची टांगती तलवार असतानाच, पुण्यात एक नवाच घोळ समोर आला आहे. एकीकडे प्रशासनाकडून कडक कारवाईचा इशारा दिला जात आहे, तर दुसरीकडे पैसे भरून नोंदणी केल्यानंतरही सुमारे २ लाख वाहनचालकांना अद्याप कंपनीकडून नंबरप्लेट मिळालेली नाही. त्यामुळे वाहनचालकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे. मात्र, काही नागरिक नोंदणी करूनही वेळेत नंबरप्लेट बसवायला येत नसल्याने प्रलंबित प्लेट्सचा आकडा वाढत असल्याचा दावा प्रशासनाकडून केला जात आहे.
एका महिन्यात १५ लाख वाहनांचे अशक्य आव्हान
परिवहन विभागाने जून अखेरपर्यंत ही नंबरप्लेट बसवण्याची अंतिम मुदत दिली आहे. मात्र, पुणेकरांमध्ये याविषयी अद्यापही कमालीची उदासीनता पाहायला मिळत आहे. पुण्यात आतापर्यंत केवळ ९ लाख ३५ हजार वाहनांवरच ‘एचएसआरपी’ बसवण्यात यश आले आहे. उर्वरित १५ लाख वाहनांना अवघ्या एका महिन्यात नंबरप्लेट बसवणे तांत्रिकदृष्ट्या अशक्य मानले जात आहे. त्यामुळे मुदत संपल्यानंतर पुणेकरांना मोठ्या कारवाईला सामोरे जावे लागण्याची दाट शक्यता आहे.
२०१९ पूर्वीच्या वाहनांना बंधनकारक
सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानंतर, २०१९ पूर्वी खरेदी केलेल्या सर्व वाहनांसाठी ही सुरक्षा नंबरप्लेट अनिवार्य करण्यात आली आहे. जानेवारी २०२५ पासून या मोहिमेला प्रत्यक्ष सुरुवात झाली. पुणे शहरात एकूण २५ लाखांहून अधिक वाहनांना ही नंबरप्लेट लावणे गरजेचे होते. त्यापैकी आतापर्यंत ११ लाख ३६ हजार वाहनधारकांनी नोंदणी प्रक्रिया पूर्ण केली असून प्रत्यक्षात ९ लाख ३५ हजार वाहनांचे काम पूर्ण झाले आहे.
दंडाची घोषणा झाल्यानंतर नुकतीच अवघ्या १० हजार नवीन चालकांनी नोंदणी केली असून, त्यातील ७ हजार वाहनांना नंबरप्लेट बसवण्यात आली आहे. शासकीय यंत्रणा आणि नंबरप्लेट पुरवणारी कंपनी यांच्यातील नियोजनाअभावामुळे सर्वसामान्य वाहनधारक मात्र नाहक कोंडीत सापडले आहेत.


