Shashi Tharoor : काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि खासदार शशी थरूर यांच्या ताफ्यावर अज्ञातांनी हल्ला केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. यूडीएफ उमेदवार ए.पी. अनिल कुमार यांच्या प्रचारासाठी जात असताना केरळमधील मलप्पुरम जिल्ह्यातील वंडूर परिसरात हा प्रकार घडला.
माहितीनुसार, थरूर दोन वाहनांच्या ताफ्यासह प्रवास करत असताना अचानक दोन कारमधून आलेल्या सुमारे आठ जणांनी त्यांचा मार्ग अडवला. हल्लेखोरांनी गाडीच्या काचा ठोठावत वाहन थांबवले आणि पुढे जाण्यास मज्जाव केला. परिस्थिती गंभीर होताच थरूर यांचे सुरक्षा रक्षक हस्तक्षेपासाठी बाहेर आले, मात्र जमावाने त्यांच्यावर हल्ला करत त्यांना कारबाहेर ओढून मारहाण केली.
या घटनेनंतर पोलिसांनी तत्काळ कारवाई करत दोघांना ताब्यात घेतले आहे. थरूर यांनी हा हल्ला पूर्वनियोजित असल्याचा आरोप केला असून विरोधकांवर संशय व्यक्त केला आहे. वंडूर पोलीस ठाण्यात विविध कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.


