Sanjay Raut : बारामती आणि राहुरी पोटनिवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राज्यातील राजकारण पुन्हा एकदा तापलं आहे. महायुतीकडून बारामतीची निवडणूक बिनविरोध करण्याचे प्रयत्न सुरू असताना, महाविकास आघाडीकडून उमेदवार देण्याची शक्यता नाकारलेली नाही.
दरम्यान, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी उद्धव ठाकरे यांच्याशी संपर्क साधत पाठिंब्याची विनंती केल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे ठाकरेंची भूमिका काय असणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
यावर प्रतिक्रिया देताना खासदार संजय राऊत यांनी सांगितले की, बारामती आणि राहुरी या दोन्ही जागा प्रामुख्याने शरद पवार यांच्या पक्षाच्या वाट्याला येतात. त्यामुळे अंतिम निर्णय राष्ट्रवादी काँग्रेसकडून घेतला जाईल. या संदर्भात जयंत पाटील यांच्याशीही चर्चा झाल्याचे त्यांनी नमूद केले.
राहुरीबाबत बोलताना त्यांनी सांगितले की, शिवसेनेकडून तीन इच्छुक उमेदवार असले तरी महाविकास आघाडी म्हणून एकत्रित निर्णय घेतला जाईल. माजी आमदार प्राजक्त तनपुरे यांच्याबाबत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये लवकरच निर्णय होण्याची शक्यता आहे.
बारामतीत पाठिंब्याच्या प्रश्नावर बोलताना राऊत म्हणाले की, सुनेत्रा पवार या भाजपसोबत निवडणूक लढत आहेत आणि त्या महाविकास आघाडीच्या उमेदवार नाहीत. त्यामुळे ठाकरेंनी अद्याप कोणताही अंतिम निर्णय घेतलेला नसून, योग्य वेळी भूमिका स्पष्ट केली जाईल.


