Congress News : महाराष्ट्रात काँग्रेस पक्षाने संघटनात्मक पातळीवर मोठे बदल करण्याचा निर्णय घेतला असून राज्यभरातील जिल्हाध्यक्ष आणि शहराध्यक्षांच्या नियुक्त्यांची प्रक्रिया वेगाने सुरू झाली आहे. तळागाळात पक्ष बळकट करण्यासाठी आणि नव्या नेतृत्वाला संधी देण्यासाठी हा मोठा निर्णय घेतल्याचे सांगितले जात आहे.
मात्र, काँग्रेसमधील पारंपरिक गटबाजी या प्रक्रियेदरम्यान पुन्हा समोर येण्याची शक्यता असल्याने प्रत्येक गटाकडून आपल्या समर्थकाला पद मिळवून देण्यासाठी जोरदार हालचाली सुरू आहेत. याच पार्श्वभूमीवर केंद्रातील वरिष्ठ नेतृत्वाने यावेळी वेगळी रणनीती आखल्याची चर्चा आहे.
राज्यात सुमारे ७० हून अधिक जिल्ह्यांमध्ये नव्या जिल्हाध्यक्षांची नियुक्ती होण्याची शक्यता असून, प्रमुख शहरांतील शहराध्यक्ष पदांवरही मोठे फेरबदल अपेक्षित आहेत. या प्रक्रियेत इच्छुकांकडून अर्ज मागवले जाणार असून, नियुक्त निरीक्षक जिल्हानिहाय दौरे करून स्थानिक कार्यकर्त्यांशी संवाद साधतील. त्यानंतर तयार होणाऱ्या अहवालांच्या आधारे अंतिम निर्णय दिल्लीतील पक्षश्रेष्ठी घेणार आहेत.
या फेरबदलाचा प्रभाव केवळ जिल्हा आणि शहर पातळीपुरता मर्यादित न राहता तालुका स्तर, तसेच युवक, महिला, ओबीसी आणि इतर आघाड्यांपर्यंत जाणार आहे. त्यामुळे हजारो पदाधिकाऱ्यांची नव्याने निवड होण्याची शक्यता आहे. संपूर्ण प्रक्रिया साधारण एका महिन्यात पूर्ण करण्याचे नियोजन करण्यात आले आहे.
विशेष म्हणजे, या प्रक्रियेसाठी दिल्लीतून ३७ निरीक्षकांची नियुक्ती करण्यात आली असून, त्यांना जिल्हानिहाय जबाबदाऱ्या देण्यात आल्या आहेत. इच्छुकांनी पंधरा दिवसांत अर्ज सादर करायचा असून निरीक्षकांकडून सहा जणांचे पॅनल तयार करून वरिष्ठांकडे पाठवले जाणार आहे.
दरम्यान, निरीक्षकांवर स्थानिक नेत्यांचा प्रभाव पडू नये म्हणून त्यांच्यावरही थेट दिल्लीतून नजर ठेवली जाणार आहे. यासाठी गुप्त व्यक्ती नियुक्त केली जाणार असून ती स्वतंत्र अहवाल तयार करेल. निरीक्षक आणि गुप्त अहवाल यामध्ये सुसंगती आहे का, याची पडताळणी करूनच अंतिम नियुक्त्या करण्यात येणार आहेत.


