मुंबई : उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाला मुंबई महानगरपालिकेत मोठा राजकीय फटका बसला आहे. भांडूप येथील ‘एस’ विभागातील प्रभाग क्रमांक १११ चे नगरसेवक दीपक सावंत यांचे नगरसेवकपद अधिकृतपणे रद्द करण्यात आले आहे. महापालिका सभागृहात महापौर रितू तावडे यांनी याबाबतची घोषणा केली.
नेमके काय घडले?
दीपक सावंत हे नुकत्याच झालेल्या महापालिका निवडणुकीत ओबीसी आरक्षित जागेवरून विजयी झाले होते. मात्र, रत्नागिरी जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीने त्यांचे जात प्रमाणपत्र अवैध ठरवल्याने ही कारवाई करण्यात आली. या निर्णयामुळे मुंबई महापालिकेतील शिवसेना ठाकरे गटाच्या नगरसेवकांची संख्या आता ६४ वर खाली आली आहे.
भाजपला फायदा होण्याची शक्यता
दीपक सावंत यांची जागा रिक्त झाल्यामुळे, या प्रभाग निवडणुकीत दुसऱ्या क्रमांकावर असलेल्या भाजपच्या सारिका पवार यांना न्यायालयाच्या अंतिम आदेशानंतर नगरसेवकपद मिळण्याची दाट शक्यता आहे. यामुळे महापालिकेतील पक्षीय बलाबल समीकरणात भाजपला थेट फायदा होण्याची चिन्हे आहेत.
त्याचबरोबर, गोवंडीतील प्रभाग क्रमांक १३७ चे एआयएमआयएम (AIMIM) नगरसेवक श्रमीर रमजान पटेल यांचेही जात प्रमाणपत्र अवैध ठरले होते. मात्र, त्यांना न्यायालयाकडून स्थगिती मिळाल्याने त्यांचे सदस्यत्व सध्या तरी कायम राहिले आहे.
शिवसेनेच्या वर्धापनदिनाच्या तोंडावर पक्षाला लागलेले हे धक्के आणि वाढती अस्वस्थता सध्या राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरली आहे. आरक्षित जागांवर अवैध प्रमाणपत्रांच्या आधारे निवडणूक लढवण्याचे प्रकार मुंबई महापालिकेत पहिल्यांदाच घडलेले नसून, याआधीही अनेक नगरसेवकांनी अशाच कारणांमुळे आपली पदे गमावली आहेत.


