Maharashtra Weather : महाराष्ट्रात सध्या हवामानात मोठा बदल होत असून उष्णतेच्या पार्श्वभूमीवर अवकाळी पावसाची शक्यता वाढली आहे. हवामान विभागाने राज्यातील काही भागांसाठी यलो अलर्ट जारी करत सतर्कतेचा इशारा दिला आहे. ५ एप्रिल २०२६ रोजी राज्यातील अनेक भागांत वादळी वाऱ्यासह विजांच्या कडकडाटात हलका ते मध्यम पाऊस होण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.
कोकण विभागात मुंबई, ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि पालघर या जिल्ह्यांत उष्ण व दमट हवामान कायम राहणार असून आर्द्रतेमुळे उकाडा अधिक जाणवण्याची शक्यता आहे.
मध्य महाराष्ट्रातील कोल्हापूर, सांगली, सातारा आणि सोलापूर या जिल्ह्यांत वातावरणात बदल होऊन काही ठिकाणी वाऱ्यांचा वेग वाढण्यासह हलक्या सरी कोसळू शकतात. तर जळगाव आणि नाशिक जिल्ह्यांत अधिकृत अलर्ट नसला तरी ढगाळ वातावरणासह पावसाची शक्यता नाकारता येत नाही.
मराठवाड्यातील नांदेड, हिंगोली आणि परभणी या जिल्ह्यांना यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. या भागांत विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता असून जालना, बीड, लातूर आणि धाराशिव जिल्ह्यांतही ढगाळ वातावरण राहण्याचा अंदाज आहे.
विदर्भातील चंद्रपूर, भंडारा, गोंदिया आणि नागपूर जिल्ह्यांसाठीही हवामान विभागाने यलो अलर्ट जारी केला आहे.
अचानक बदलणाऱ्या हवामानामुळे नागरिकांनी सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले असून, विशेषतः वादळी वाऱ्यांपासून आणि विजेपासून खबरदारी घेण्याचा सल्ला देण्यात आला आहे.


