Phaltan Doctor Case : फलटण येथील महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरणात महत्त्वाची घडामोड समोर आली आहे. या प्रकरणात अटकेत असलेले बडतर्फ पोलीस उपनिरीक्षक (PSI) गोपाळ बदने यांना मुंबई उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर खंडपीठाने जामीन मंजूर केला आहे. पाच महिन्यांपासून कारागृहात असलेल्या बदने यांना ५० हजार रुपयांच्या जातमुचलक्यावर आणि काही अटींसह दिलासा देण्यात आला.
ही घटना २३ ऑक्टोबर २०२५ रोजी फलटणमधील एका हॉटेलमध्ये घडली होती. बीड येथील मूळ रहिवासी असलेल्या महिला डॉक्टरने गळफास घेत आत्महत्या केली होती. या प्रकरणात आत्महत्येस प्रवृत्त केल्याच्या आरोपाखाली गोपाळ बदने आणि घरमालक प्रशांत बनकर यांना अटक करण्यात आली होती.
माहितीनुसार, डॉक्टर आणि घरमालक यांच्यात वाद झाल्यानंतर तिच्या राहत्या घराला कुलूप लावण्यात आले होते. त्यानंतर तिने हॉटेलमध्ये मुक्काम केला. मदतीसाठी तिने बदने आणि बनकर यांच्याशी संपर्क साधला होता, मात्र अपेक्षित मदत न मिळाल्याने ती मानसिक तणावात होती, असे समोर आले.
घटनेनंतर तिच्या हातावर लिहिलेल्या चिठ्ठीत दोघांकडून मानसिक व शारीरिक छळ झाल्याचा उल्लेख होता. या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल करून दोघांना अटक केली होती.
दरम्यान, न्यायालयाने दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकल्यानंतर बदने यांना अटींसह जामीन मंजूर केला आहे. या निर्णयानंतर आता पुढील तपास आणि न्यायालयीन प्रक्रियेवर सर्वांचे लक्ष लागले आहे.


