Commits Suicide : छत्रपती संभाजीनगरमध्ये एका नवविवाहित महिलेच्या आत्महत्येने खळबळ उडाली आहे. मृदंगवादक म्हणून ओळख असलेल्या अमोल लघाणे यांच्या पत्नी काजल लघाणे यांनी राहत्या घरी गळफास घेत जीवन संपवलं. लग्नाला अवघे एक वर्ष पूर्ण होण्याआधीच घडलेल्या या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, काजल यांचे लग्न २५ मार्च २०२५ रोजी पारंपरिक पद्धतीने झाले होते. सुरुवातीला संसार सुरळीत सुरू होता. मात्र काही महिन्यांनंतर नवऱ्याच्या वागण्यात बदल झाला. काजलच्या कुटुंबीयांच्या आरोपानुसार, अमोल यांचे दुसऱ्या महिलेसोबत संबंध होते आणि याच कारणावरून काजलला मानसिक व शारीरिक त्रास दिला जात होता.
१ एप्रिल रोजी सकाळी काजल यांनी राहत्या घरात आत्महत्या केली. कुटुंबीयांनी तातडीने रुग्णालयात नेले, मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. घटनेनंतर काजलच्या नातेवाईकांनी पतीविरोधात गंभीर आरोप करत कठोर कारवाईची मागणी केली आहे.
या प्रकरणी पोलिसांकडून गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असून पुढील तपास सुरू आहे.


