Raigad News : रायगड जिल्ह्यातील पेण येथे एक अत्यंत हृदयद्रावक घटना घडली आहे. भोगावती नदीतील डोहात बुडून 20 वर्षीय वसीम शेख अन्सारी या तरुणाचा मृत्यू झाला. या दुर्दैवी घटनेमुळे परिसरात शोककळा पसरली असून अन्सारी कुटुंबीयांवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, वसीम हा आपल्या मित्रांसोबत पेणमधील पिंपळडोह परिसरात नदीकिनारी हॉलिबॉल खेळत होता. खेळादरम्यान चेंडू पाण्यात गेल्याने तो काढण्यासाठी वसीम नदीत उतरला. मात्र पाण्याचा अंदाज न आल्याने आणि दम लागल्यामुळे तो खोल डोहात बुडाला.
घटनेची माहिती मिळताच पेण पोलीस तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. स्थानिक नागरिकांच्या मदतीने शोधमोहीम सुरू करण्यात आली, परंतु अनेक तासांपर्यंत वसीमचा शोध लागला नाही. त्यानंतर पोलिस निरीक्षक संदीप बागुल यांनी खोपोलीतील हेल्थ फाउंडेशन आणि कोलाड येथील SVRSS रेस्क्यू टीमला पाचारण केले.
रेस्क्यू टीमने अथक प्रयत्न करत सुमारे साडेतीन तासांच्या शोधानंतर वसीमचा मृतदेह पाण्याबाहेर काढला. त्यानंतर मृतदेह पेण उपजिल्हा रुग्णालयात पाठवण्यात आला असून पुढील तपास पेण पोलीस करत आहेत.


