Ahilyanagar News : अहिल्यानगर जिल्ह्यातील शेवगाव तालुक्यात धक्कादायक प्रकार समोर आला असून, आंब्याचा रस सेवन केल्यानंतर एकाच कुटुंबातील सात जणांना विषबाधा झाल्याची घटना घडली आहे. अचानक चक्कर येणे, शरीराचा तोल जाणे आणि अस्वस्थ वाटू लागल्याने सर्वांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. या घटनेमुळे परिसरात भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे.
अहिल्यानगरमधील खासगी रुग्णालयात उपचार सुरू
शेवगाव शहरातील आरे वस्ती येथे राहणाऱ्या जायभाय कुटुंबाने बाजारातून आंबे खरेदी केले होते. घरातील सदस्यांनी त्या आंब्यांचा रस तयार करून सेवन केला. मात्र काही वेळातच कुटुंबातील सदस्यांची प्रकृती बिघडू लागली. सुरुवातीला त्यांना स्थानिक खासगी रुग्णालयात उपचारासाठी नेण्यात आलं, पण तब्येत अधिक खालावल्याने पुढे अहिल्यानगरमधील खासगी रुग्णालयात हलवण्यात आलं.
उपचार करणाऱ्या डॉक्टरांच्या मते, संबंधित आंबे कृत्रिमरित्या पिकवण्यासाठी ‘कॅल्शियम कार्बाइड’सारख्या रसायनांचा वापर झाला असण्याची शक्यता नाकारता येत नाही. हे रसायन ओलाव्याच्या संपर्कात आल्यानंतर ‘अॅसिटिलीन’ वायू निर्माण होतो, जो आरोग्यासाठी अत्यंत धोकादायक मानला जातो. अशा प्रकारे फळे पिकवणे कायद्याने बंदीस्त आहे. डॉक्टरांनी सांगितलं की, रुग्णांमध्ये दिसून आलेली लक्षणे ही रासायनिक विषबाधेशी संबंधित असू शकतात. सुदैवाने उपचारानंतर सातपैकी सहा जणांना घरी सोडण्यात आलं असून एका रुग्णावर अद्याप उपचार सुरू आहेत. सर्वांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती डॉक्टरांनी दिली.
दरम्यान, या घटनेनंतर प्रशासनही सतर्क झालं आहे. पाथर्डी परिसरात केमिकलचा वापर करून आंबे पिकवले जात असल्याच्या संशयावरून आरोग्य विभाग आणि पंचायत समितीकडून तपासणी मोहीम सुरू करण्यात आली आहे. फळविक्रेत्यांकडून आंब्यांचे नमुने जप्त करण्यात आले असून ते प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठवले जाणार आहेत. आरोग्य विभागाने नागरिकांना आंबे खरेदी करताना सावधगिरी बाळगण्याचं आवाहन केलं आहे. अतिशय चमकदार, एकसारखा पिवळा रंग असलेले किंवा कृत्रिम वास येणारे आंबे खरेदी टाळावेत, असा सल्लाही देण्यात आला आहे.


