Eknath Shinde : महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा मोठ्या घडामोडींना वेग आला आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे आज अचानक दिल्ली दौऱ्यावर रवाना झाले असून, त्यांच्या या दौऱ्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.
विधानपरिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जागावाटपाचा तिढा सोडवण्यासाठी शिंदे दिल्लीला गेल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे. राज्यात विधानपरिषदेच्या १६ जागांसाठी निवडणुका जाहीर झाल्या असून, महायुतीत जागावाटपावरून मतभेद उफाळल्याची चर्चा आहे.
शिंदे गटाच्या शिवसेनेने ६ ते ७ जागांची मागणी केली आहे. मात्र भाजपकडून केवळ ३ ते ४ जागा देण्याची तयारी दर्शवण्यात आल्याने नाराजी वाढल्याचे बोलले जात आहे. मुंबईत अनेक बैठका होऊनही अंतिम तोडगा न निघाल्यानेच शिंदेंनी थेट दिल्ली गाठल्याचे सांगितले जात आहे.
दिल्ली दौऱ्यात शिंदे हे केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची तातडीची भेट घेण्याची शक्यता आहे. या बैठकीत विधानपरिषद जागावाटपासोबतच राज्यातील आगामी राजकीय रणनीती आणि चर्चेत असलेल्या ‘ऑपरेशन टायगर’वरही महत्त्वपूर्ण चर्चा होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
महायुतीतील जागावाटपाचा हा तिढा नेमका कसा सुटतो आणि शिंदे गटाला किती जागा मिळतात, याकडे आता संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.


