Uddhav Thackeray : महाराष्ट्राच्या राजकारणात पक्षांतराच्या हालचालींना पुन्हा वेग आला असून, विदर्भातील वाशिम जिल्ह्यात उद्धव ठाकरे यांच्या शिवसेना ठाकरे गटाला मोठा धक्का बसला आहे.
वाशिमचे माजी शिवसेना जिल्हाप्रमुख सुरेश मापारी यांनी पदाचा राजीनामा दिल्यानंतर अवघ्या दोन दिवसांत भाजपमध्ये प्रवेश करण्याचा निर्णय घेतला आहे. विशेष म्हणजे, ते एकटे नाही तर सुमारे 250 कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांसह भाजपचा झेंडा हाती घेणार आहेत.
सुरेश मापारी यांच्या नेतृत्वाखाली 20 गाड्यांचा ताफा काल रात्री मुंबईकडे रवाना झाला. या ताफ्यात प्रमुख पदाधिकारी, सरपंच आणि कार्यकर्त्यांचा समावेश असल्याची माहिती समोर आली आहे. आज सकाळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत हा पक्षप्रवेश सोहळा पार पडणार असल्याचे सांगितले जात आहे.
दरम्यान, ठाकरे गटाने दोन दिवसांपूर्वीच वाशिम जिल्हाप्रमुख पदाची जबाबदारी सुरेश मापारी यांच्याकडून काढून घेत बालाजी वानखेडे यांच्याकडे सोपवली होती. यामुळे मापारी नाराज असल्याची चर्चा सुरू होती. तसेच स्थानिक खासदार संजय देशमुख यांच्या कार्यपद्धतीवर आणि पक्षातील अंतर्गत राजकारणावरही त्यांनी नाराजी व्यक्त केल्याचे बोलले जात होते.
याआधी सुरेश मापारी हे एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत जाणार असल्याची चर्चा रंगली होती. मात्र अखेर त्यांनी भाजपमध्ये प्रवेश करण्याचा निर्णय घेतल्याने वाशिमच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे.
सुरेश मापारी यांनी यापूर्वी जिल्हा परिषद सदस्य, अर्थ व बांधकाम समिती सभापती तसेच कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती अशी अनेक महत्त्वाची पदे भूषवली आहेत. ग्रामीण भागात त्यांचा मजबूत जनसंपर्क आणि कार्यकर्त्यांचे मोठे जाळे असल्याने आगामी निवडणुकांमध्ये ठाकरे गटाला याचा फटका बसू शकतो, अशी चर्चा आता राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे.


