Crime News : धुळे जिल्ह्यात नात्यांना काळीमा फासणारी अत्यंत धक्कादायक घटना समोर आली आहे. लग्नाला विरोध करत असल्याच्या संशयातून एका मुलाने स्वतःच्या आईला जिवंत पेटवून ठार मारल्याची घटना उघडकीस आली असून, संपूर्ण परिसर हादरला आहे. या प्रकरणी पोलिसांनी आरोपी मुलाला अटक केली आहे.
ही घटना धुळे तालुक्यातील महिंदळे येथे घडली. आरोपीने आपल्या वृद्ध आईच्या अंगावर ज्वलनशील पदार्थ ओतून तिला पेटवून दिल्याची माहिती पोलिस तपासात समोर आली आहे. गंभीर भाजलेल्या अवस्थेत महिलेला रिक्षातून जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला.
मृत महिलेचे नाव जिजाबाई भटू खैरनार (वय ६५) असे असून, आरोपी मुलाचे नाव प्रदीप खैरनार (वय ४५) आहे. सुरुवातीला आई स्वतःहून पेटल्याचा बनाव आरोपीने केला होता. मात्र पोलिसांनी संशय आल्याने कसून चौकशी केली असता, त्याने आईची हत्या केल्याची कबुली दिली.
पोलिसांच्या माहितीनुसार, आरोपी प्रदीप खैरनार हा दारूच्या नशेत होता. आई आपल्या विवाहात अडथळा आणत असल्याचा संशय त्याच्या मनात होता. त्याच संशयातून त्याने हे टोकाचे पाऊल उचलल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे.
या अमानुष घटनेमुळे महिंदळे परिसरात मोठी खळबळ उडाली असून, पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे.


