NEET Paper Leak : पुण्यातील गाजलेल्या NEET पेपरफुटी प्रकरणात दररोज नवे धक्कादायक खुलासे समोर येत आहेत. या प्रकरणातील मुख्य आरोपी मनिषा हवालदार हिने पुरावे नष्ट करण्यासाठी अत्यंत नियोजनबद्ध पद्धतीने हालचाली केल्याचे सीबीआयच्या तपासातून उघड झाले आहे. तपास यंत्रणांपर्यंत धागेदोरे पोहोचू नयेत यासाठी तिने भौतिकशास्त्राच्या प्रश्नांच्या नोट्स जाळून टाकल्याची माहिती समोर आली आहे.
सीबीआयच्या तपासानुसार, नीट परीक्षेशी संबंधित फिजिक्स विषयाच्या काही हस्तलिखित नोट्स मनिषा हवालदारने स्वतः नष्ट केल्या. या नोट्समध्ये प्रश्नसंचाशी संबंधित महत्त्वाची माहिती असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. तपास यंत्रणांना कोणतेही लेखी पुरावे मिळू नयेत, या उद्देशाने तिने हा प्रकार केल्याचे सांगितले जात आहे.
याशिवाय, डिजिटल पुरावे नष्ट करण्याचाही प्रयत्न करण्यात आला. सहआरोपी मनिषा मांढरे हिच्यासोबतचे व्हॉट्सॲप चॅट, मेसेज आणि संवाद मनिषा हवालदारने डिलीट केल्याची माहिती तपासातून समोर आली आहे. तपास यंत्रणांना कोणताही पुरावा हाती लागू नये म्हणून हे मेसेज हटवण्यात आल्याचा संशय आहे. आता सीबीआयकडून हे चॅट आणि डिजिटल डेटा पुन्हा मिळवण्यासाठी सायबर तज्ज्ञांची मदत घेतली जात आहे.
तपासात आणखी एक महत्त्वाचा खुलासा समोर आला आहे. मनिषा हवालदारने स्वतःच्या मोबाईलऐवजी पतीच्या फोनचाही वापर केल्याचे समोर आले आहे. पतीच्या मोबाईलवरून तिने मनिषा मांढरेला प्रश्नसंच पाठवल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे. त्यामुळे पतीच्या फोनमधील मेसेज आणि कॉल डिटेल्स या तपासातील महत्त्वाचा दुवा ठरण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
सीबीआयकडून या संपूर्ण प्रकरणाचा सखोल तपास सुरू असून, पेपरफुटी रॅकेटमधील आणखी धक्कादायक माहिती समोर येण्याची शक्यता आहे.


