Jalgaon News: नियतीचा खेळ अत्यंत क्रूर असतो, याचाच प्रत्यय जळगाव जिल्ह्यात आला आहे. ज्या हातांवरील लग्नाची मेहंदी अजून नीट पूसली नव्हती, त्याच नवविवाहितेला काळाने कायमचे हिरावून घेतले. जळगाव जिल्ह्यात सध्या सुरू असलेल्या सूर्याच्या प्रकोपाने (Heat Wave) एका २० वर्षीय नवविवाहितेचा बळी घेतल्याची हृदयद्रावक घटना घडली आहे. वैशाली सुनील भील असे या दुर्दैवी तरुणीचे नाव असून, लग्नानंतर अवघ्या २० दिवसांतच तिने जगाचा निरोप घेतल्याने जामनेर आणि चोपडा तालुक्यावर शोककळा पसरली आहे.
लग्नाची धामधूम ठरली जीवघेणी?
वैशाली यांचा विवाह २३ मे २०२६ रोजी मोहाडी (ता. जामनेर) येथील सुनील भील यांच्याशी मोठ्या थाटामाटात झाला होता. संसाराचे नवे पायंडा रचत असतानाच, ११ मे रोजी त्या पतीसह नातेवाईकांच्या लग्नासाठी चोपडा तालुक्यातील खामखेडा येथे गेल्या होत्या. भर उन्हात केलेला हा प्रवास आणि लग्नातील दगदग त्यांच्या जीवावर बेतली.
चक्कर आली अन्… वाटेतच प्राणज्योत मालवली
लग्नाचा सोहळा आटोपून घरी परतल्यावर वैशाली यांना प्रचंड थकवा जाणवत होता. दुपारी २ च्या सुमारास अचानक अंगात ताप भरला आणि त्या भोवळ येऊन खाली कोसळल्या. कुटुंबीयांनी तातडीने त्यांना नेरी येथील ग्रामीण रुग्णालयात नेले, मात्र प्रकृती गंभीर असल्याने त्यांना पुढील उपचारासाठी जळगाव शासकीय रुग्णालयात हलवण्यास सांगण्यात आले. दुर्दैवाने, जळगावला पोहोचण्यापूर्वीच वाटेतच त्यांची प्राणज्योत मालवली.
जिल्ह्यात उन्हाचा तडाखा; अमळनेरमध्ये पुजाऱ्याचाही मृत्यू
उष्माघाताचा धोका केवळ वैशालीपुरता मर्यादित राहिला नाही. अमळनेर बसस्थानकावर बसची वाट पाहत असताना बहादरपूर येथील पुजारी प्रभाकर जोशी यांचाही अचानक चक्कर येऊन जागीच मृत्यू झाला. या दोन्ही घटनांमुळे जिल्ह्यात मे हिटची दाहकता किती भयानक आहे, हे पुन्हा एकदा अधोरेखित झाले आहे.


