Manoj Jarange : राज्यात इंधन टंचाई आणि वाढत्या दरांमुळे नागरिक त्रस्त असतानाच मराठा आंदोलनकर्ते मनोज जरांगे यांनी केंद्र सरकार आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर जोरदार टीका केली आहे. “निवडणुका संपेपर्यंत गाड्या दणादण पळवल्या आणि आता सामान्य जनतेला वाऱ्यावर सोडलं,” असा आरोप त्यांनी केला.
इंधन तुटवड्याच्या पार्श्वभूमीवर बोलताना जरांगे पाटील म्हणाले की, “पंतप्रधानांच्या आवाहनाला सर्वांनी साथ दिली पाहिजे. शेतकऱ्यांनी आता शेती कोरडी पडली तरी चालेल पण पेरण्या आणि नांगरणी करू नये,” असा खोचक टोला त्यांनी लगावला.
“ट्रॅक्टर शेतात, मालक पंपावर”
ग्रामीण भागातील परिस्थिती अत्यंत गंभीर झाल्याचे सांगताना त्यांनी शेतकऱ्यांच्या अडचणी मांडल्या. “आज ट्रॅक्टर शेतात उभा आहे आणि त्याचा मालक पेट्रोल पंपावर हातात कॅन घेऊन रांगेत उभा आहे. उद्या घरात मेडिकल इमर्जन्सी आली किंवा कुठे सुख-दुःखाच्या प्रसंगाला जायचं असेल तर लोकांनी काय करायचं?” असा सवाल त्यांनी उपस्थित केला.
“निवडणुकांत इंधन कमी पडलं नाही”
सरकारवर निशाणा साधताना जरांगे पाटील म्हणाले, “जोपर्यंत निवडणुका होत्या तोपर्यंत प्रचारासाठी गाड्या भरधाव धावत होत्या. तेव्हा पेट्रोल-डिझेलची कमतरता भासली नाही. पण निवडणुका संपताच सामान्य लोकांना त्रास सहन करावा लागत आहे.”
“मी डोक्याला तेल लावणंही बंद केलं”
मोदींच्या आवाहनांचा संदर्भ देत त्यांनी उपरोधिक शैलीत टीका केली. “मोदींचं आवाहन खूप कठीण आहे. मी त्यांच्या आवाहनाला पाठिंबा दिला आहे. अगदी मी डोक्याला तेल लावणंही बंद केलं आहे. तेल वाचवा मोहीमच सुरू केली आहे,” असे म्हणत त्यांनी सरकारवर निशाणा साधला.
राज्यात सुरू असलेल्या इंधन टंचाईमुळे शेतीकामांवर परिणाम होत असून, जरांगेंच्या या वक्तव्यामुळे राजकीय वातावरण आणखी तापण्याची चिन्हे दिसत आहेत.


