Maharashtra Politics : उल्हासनगर महानगरपालिका राजकारणात मोठी राजकीय घडामोड घडली असून शिवसेना शिंदे गटाचे नगरसेवक विकी सिंग लबाना यांचे नगरसेवक पद रद्द करण्यात आले आहे. या निर्णयामुळे शिंदे गटाला मोठा धक्का बसल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे.
विकी सिंग लबाना हे उल्हासनगर महानगरपालिका निवडणुकीत पॅनल क्रमांक ६ “अ” मधून निवडून आले होते. त्यांनी निवडणूक लढवताना “बंजारा” जातीचे प्रमाणपत्र सादर करून ओबीसी प्रवर्गातून उमेदवारी दाखल केली होती.
मात्र, जिल्हा जात पडताळणी प्रमाणपत्र समिती, नाशिक यांनी त्यांच्या जात प्रमाणपत्राची पडताळणी करताना काही त्रुटी आढळल्याचे नमूद केले. त्यानंतर समितीने त्यांचे जात प्रमाणपत्र अवैध ठरवले.
या निर्णयानंतर उल्हासनगर महानगरपालिका आयुक्त मनीषा आव्हाळे यांनी अधिकृत आदेश काढत विकी सिंग लबाना यांचे नगरसेवक पद रद्द केल्याची घोषणा केली.
या कारवाईमुळे उल्हासनगरच्या राजकीय वर्तुळात खळबळ उडाली असून आगामी महानगरपालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर या निर्णयाकडे महत्त्वपूर्ण घडामोड म्हणून पाहिले जात आहे.


