मुंबई : भाजप नेत्या व राज्याच्या पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांचे पीए अनंत गर्जे यांची पत्नी डॉ. गौरी पालवे-गर्जे यांनी २२ नोव्हेंबरला वरळीतील त्यांच्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. या घटनेने राज्यात खळबळ उडाली असून, गौरीच्या माहेरच्या कुटुंबीयांनी अनंतसह त्याच्या बहिण शीतल गर्जे व भाव अजय गर्जे यांच्यावर मानसिक व शारीरिक छळाचा आरोप करत आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल केला आहे.
आता या प्रकरणात अनंतच्या जुन्या प्रेयसीचा जबाब समोर आल्याने नवा ट्विस्ट आला आहे. तिने पोलिसांना २०२२ पासून अनंतशी कोणतेही संबंध नसल्याचे सांगितले असून, गौरीला घरात सापडलेल्या गर्भपाताच्या कागदपत्रांबाबतही काहीच माहिती नसल्याचा दावा तिने केला आहे.
वरळी पोलिसांनी या प्रकरणाचा सखोल तपास सुरू ठेवला असून, मंगळवारी (२ डिसेंबर) कोर्टात झालेल्या सुनावणीत अनंत गर्जेला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. पोलिसांनी कोर्टात सांगितले की, अनंतची पॉलीग्राफ टेस्ट व मानसशास्त्रीय तपासणी आवश्यक आहे.
वैज्ञानिक तज्ज्ञांच्या मदतीने तपास पुढे नेला जाईल, असेही पोलिसांनी नमूद केले. यापूर्वी अनंतची पोलिस कोठडी २ डिसेंबरपर्यंत वाढवण्यात आली होती, परंतु आता न्यायालयीन कोठडीत ठेवण्यात आल्याने तपासाला वेग येईल, असा विश्वास पोलिसांनी व्यक्त केला.
अनंतच्या जुन्या प्रेयसीचा जबाब
कोर्टात पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, एफआयआरमध्ये नाव नमूद केलेल्या अनंतच्या जुन्या प्रेयसीचा जबाब नोंदवण्यात आला आहे. तिने वरळी पोलिसांना सांगितले की, “२०२२ पासून माझे अनंत गर्जेशी कोणतेही वैयक्तिक संबंध नाहीत. गौरीला आमच्या घरी सापडलेल्या गर्भपाताच्या रिपोर्ट्स किंवा कागदपत्रांबाबत मला काहीच माहिती नाही.”
हे कागदपत्र गौरीला घरात सापडले असल्याने ती नैराश्यात गेल्याचा संशय आहे. सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनीही या गर्भपाताच्या प्रकरणाबाबत धक्कादायक खुलासा केला असून, अनंतच्या विवाहबाह्य संबंधांमुळे गौरीला मानसिक त्रास होत असल्याचे सांगितले.


