बुलढाणा : महाराष्ट्र राज्यातील २६४ नगरपरिषद व नगरपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांदरम्यान (१ डिसेंबर) बुलढाणा शहरात बोगस मतदार घोटाळ्याने राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे. शिवसेना (शिंदे गट) आमदार संजय गायकवाड यांचे पुत्र कुणाल गायकवाड आणि नातेवाईक श्रीकांत गायकवाड यांनी पोलिसांच्या ताब्यात असलेल्या बोगस मतदाराला पळवून लावण्यास मदत केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल झाल्याने राज्यभर खळबळ उडाली असून, पोलिसांनी दोघांविरुद्ध शासकीय कामात अडथळा आणल्याबद्दल गुन्हा दाखल केला आहे.
बुलढाणा शहर पोलिस ठाण्यात नोंदवलेल्या या गुन्ह्याबाबत पोलीस अधीक्षक निलेश तांबे यांनी सांगितले की, मतदानाच्या दिवशी सकाळी शासकीय तांत्रिक संस्था येथील मतदान केंद्रावर दुसऱ्याच्या नावाने बोगस मतदान करण्याचा प्रयत्न करणाऱ्या व्यक्तीला स्थानिक नागरिक आणि कार्यकर्त्यांनी रंगेहाथ पकडले. त्या व्यक्तीला पोलिसांनी ताब्यात घेतले. यावेळी कुणाल गायकवाड आणि श्रीकांत गायकवाड हे घटनास्थळी दाखल झाले आणि बोगस मतदाराला गर्दीतून पळवून लावण्यास मदत केली. यामुळे पोलिस अंमलदाराच्या कायदेशीर कामात अडथळा निर्माण झाला.
नेमकं काय घडलं?
मतदानाच्या सुरुवातीच्या काही तासांत गांधी प्राथमिक शाळेतील मतदान केंद्रावर काँग्रेस कार्यकर्ते आणि स्थानिक नागरिकांनी एका संशयित बोगस मतदाराला ओळखले. त्या व्यक्तीने दुसऱ्याच्या ओळखपत्राचा वापर करून मतदान करण्याचा प्रयत्न केला असल्याचा आरोप आहे. पोलिस निरीक्षक रवी राठोड यांच्या नेतृत्वाखालील टीम घटनास्थळी दाखल झाली आणि संशयिताला ताब्यात घेतले.
मात्र, तात्काळ आमदार संजय गायकवाड यांचे पुत्र कुणाल गायकवाड आपल्या सहकाऱ्यांसह तिथे पोहोचले. त्यांनी पोलिसांना शिवीगाळ करून धमकावले आणि बोगस मतदाराला सोडून देण्याची मागणी केली. शेवटी, गर्दीचा फायदा घेऊन बोगस मतदार पळून गेला, असा दावा काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केला आहे.


