Ashok Kharat Crime news : नाशिकमधील भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणात नवे धक्कादायक तपशील समोर आले आहेत. आरोपीने लैंगिक अत्याचार केलेल्या महिलांचे काही आक्षेपार्ह व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्याने पीडित महिलांना प्रचंड मानसिक धक्का बसल्याची माहिती आहे.
समोर आलेल्या माहितीनुसार, खरातच्या केबिनमधील काही व्हिडिओ इंटरनेटवर प्रसारित झाले असून त्यामध्ये तो महिलांसोबत लैंगिक संबंध ठेवताना दिसत आहे. विशेष म्हणजे, अनेक व्हिडिओंमध्ये महिलांचे चेहरे स्पष्ट दिसत असल्याने त्यांची ओळख उघड होण्याचा धोका निर्माण झाला आहे. पोलिसांनी यापूर्वीच असे व्हिडिओ शेअर करू नयेत, असा इशारा दिला होता. तरीही काहींनी हे व्हिडिओ व्हायरल केल्याने परिस्थिती अधिक गंभीर झाली आहे.
या घटनेनंतर आठ ते नऊ पीडित महिलांनी मानसोपचार तज्ञांची मदत घेतल्याची माहिती आहे. व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर या महिला नैराश्यात गेल्या असून त्यांना असुरक्षित आणि एकाकी वाटत असल्याचे समोर आले आहे. विशेष तपास पथकाकडून (SIT) महिलांना धीर देत त्या सुरक्षित असल्याचे सांगण्यात आले असून त्यांना न्याय मिळेल, अशी ग्वाही देण्यात आली आहे.
दरम्यान, पोलिसांकडून पीडित महिलांची चौकशी गोपनीय पद्धतीने अज्ञातस्थळी केली जात आहे, जेणेकरून त्यांची ओळख सुरक्षित राहील. तसेच, आक्षेपार्ह व्हिडिओ व्हायरल करणाऱ्यांवर सायबर पोलिसांकडून कठोर कारवाई सुरू करण्यात आली आहे.
या प्रकरणात आणखी एक महत्त्वाची घडामोड समोर आली आहे. तपासादरम्यान अशोक खरात याचा मुलगा हर्षवर्धन हा फरार झाल्याची माहिती समोर आली आहे. त्याचा मोबाईल फोन बंद असून तो संपर्काबाहेर आहे. यापूर्वीच आरोपीची पत्नी कल्पना खरात देखील फरार आहे. त्यामुळे या प्रकरणाचा तपास अधिक गुंतागुंतीचा बनला असून पुढील काही दिवसांत आणखी मोठे खुलासे होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.


