पुणे: सरकारी, निमसरकारी, खासगी कंपनीत किंवा संघटीत क्षेत्रासह इतर कोणत्याही संस्थेत नोकरी करत असलेल्या व्यक्तीने ऑटोरिक्षा परवाना घेतला असेल, तर त्यांनी तत्काळ स्वेच्छेने जमा करावा. हे परवाने येत्या ३० एप्रिलपर्यंत जमा करण्यास मुदतवाढ दिली आहे, असे पुणे उपप्रादेशिक परिवहन अधिकारी (आरटीओ) स्वप्निल भोसले यांनी सांगितले. मुदतीनंतर अशा पद्धतीने धारण केलेले ऑटोरिक्षा परवाने निदर्शनास आल्यास त्यांच्यावर मोटार वाहन कायदा व प्राधिकरणाच्या तरतुदीनुसार कारवाई करण्यात येणार आहे.
पुणे कार्यक्षेत्रात खुले ऑटोरिक्षा परवाना धोरण राबविण्यात येत आहे. मात्र, हा परवाना धारण करताना कोणत्याही ठिकाणी तो नोकरी करत नसल्याचे प्रतिज्ञापत्र सादर करणे आवश्यक आहे. मात्र, तरीही काही नोकरदारांनी (सरकारी/निमसरकारी) ऑटोरिक्षा परवाने घेऊन रिक्षा चालवत असल्याचे किंवा भाडेतत्वावर दिल्याचे समोर आले. त्यामुळे असा परवानाधारक व्यक्तींनी ३१ मार्चपर्यंत परवाने प्रादेशिक परिवहन कार्यालयात स्वेच्छेने जमा करावे, असे आवाहन करण्यात आले. त्यामध्ये बोटावर मोजता येईल एवढेच परवाने जमा झाले. त्यामुळे परवाने जमा करण्यासाठी मुदतवाढ देण्यात आली असून, ३० एप्रिलपर्यंत हे परवाने जमा करावे, असे आवाहन पुणे आरटीओकडून करण्यात आले आहे.


