Solapur Car Accident : सोलापूर जिल्ह्यातील नातेपुते परिसरात पहाटेच्या सुमारास भीषण अपघात झाला. मुंबईहून फोंडशिरसकडे निघालेली कार नीरा उजवा कालव्याच्या पुलावरून थेट पाण्यात कोसळली. या दुर्घटनेत तिघांचा बुडून मृत्यू झाला, तर चालक सुनील टिळेकर थोडक्यात बचावले.
मिळालेल्या माहितीनुसार, शुक्रवारी पहाटे चार ते पाचच्या दरम्यान जुन्या पालखी मार्गावर हा अपघात घडला. गाडीवरील नियंत्रण सुटल्याने कार कालव्यात पडली. पाण्यात बुडाल्याने प्रवाशांना बाहेर पडता आले नाही.
या अपघातात प्रीती टिळेकर (३०), मंजुळा जठार (५०) आणि हनुमंत जठार (५५) यांचा मृत्यू झाला. तिघेही मुंबईत वास्तव्यास असून मूळचे माण तालुक्यातील मोगराळे गावचे रहिवासी होते. सुनील टिळेकर हे गंभीर जखमी अवस्थेत बचावले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.
रामनवमीच्या निमित्ताने कुटुंब फोंडशिरसला आले होते. परतीच्या प्रवासात हा दुर्दैवी अपघात घडल्याने कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
घटनेची माहिती मिळताच पोलिस आणि स्थानिक नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली. क्रेनच्या मदतीने कार बाहेर काढण्यात आली. प्राथमिक तपासात भरधाव वेग आणि वाहनावरील नियंत्रण सुटणे हे अपघाताचे कारण असल्याचे समोर आले असून पुढील तपास सुरू आहे.


