लखनऊ: उत्तर प्रदेशची राजधानी लखनऊमध्ये एका खतरनाक गुन्हेगाराला एका हत्येच्या गुन्ह्यात दोषी ठरवण्यात आले आहे. गुन्हेगाराचे नाव राजा कोलंदर आहे. २००० मध्ये झालेल्या दुहेरी हत्याकांड प्रकरणात लखनऊ न्यायालयाने सोमवारी (दि. १९) सिरीयल किलर, नरभक्षक आणि कवटी गोळा करणारा राजा कोलंदर याला दोषी ठरवले. न्यायाधीश रोहित सिंह हे शुक्रवारी (दि.२३) त्याला शिक्षा जाहीर करणार आहेत.
२२ वर्षीय मनोज कुमार सिंग आणि त्यांचा ड्रायव्हर रवी श्रीवास्तव यांचे अपहरण करून हत्या केल्याप्रकरणी राजा कोलंदर उर्फ राम निरंजन आणि त्याचा मेहुणा बच्छराज कोल यांना दोषी ठरवण्यात आले आहे. पत्रकार धीरेंद्र सिंह यांच्या हत्येप्रकरणी राजा कोलंदर आणि बच्चराज यांना यापूर्वी दोषी ठरवण्यात आले होते. या प्रकरणात, राजाच्या फार्महाऊसमधून १४ मानवी कवट्या जप्त करण्यात आल्या होत्या. या प्रकरणात दोघांनाही जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली.
‘तो’ मानवी मेंदूपासून बनवलेला सूप प्यायचा
यानंतर, राजा कोलंदर हा नरभक्षक होता आणि तो कवट्या गोळा करत, असे हे उघड झाले. राजा कोलंदरवर लोकांचे शिरच्छेद करून त्यांच्या मेंदूपासून सूप बनवून ते प्यायल्याचा आरोप आहे. २५ वर्षांपूर्वी २००० मध्ये राजा कोलंदर आणि त्यांच्या मेहुण्याविरुद्ध दुहेरी हत्याकांडाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. याप्रकरणी मनोज कुमार सिंग यांचे वडील शिव हर्ष सिंग यांनी तक्रार दाखल केली होती.
२५ वर्षांनी शिक्षा
पोलिसांनी २१ मार्च २००१ रोजी आरोपपत्रही दाखल केले, परंतु कायदेशीर गुंतागुंतीमुळे खटल्याची सुनावणी सुरू होऊ शकली नाही. या प्रकरणाची सुनावणी २०१३ मध्ये सुरू झाली. मिळालेल्या माहितीनुसार, मनोज कुमार सिंह आणि त्यांचे चालक रवी श्रीवास्तव २४ जानेवारी २००० रोजी लखनौहून रेवाला निघाले होते. त्यांनी चारबाग रेल्वे स्थानकाजवळून सहा प्रवाशांना गाडीमध्ये बसवले. त्यात एक महिलाही होती.
शंकरगडमध्ये मृतदेह आढळला
मनोज कुमार सिंह आणि त्यांचे चालक रवी श्रीवास्तव यांचे शेवटचे ठिकाण रायबरेलीच्या हरचंदपूर येथील एका चहाच्या टपरीवर सापडले. ते तिथून बेपत्ता झाले. तीन दिवस झाले, तरी सापडले नाहीत तेव्हा नाका पोलिस ठाण्यात त्याची बेपत्ता झाल्याची तक्रार दाखल करण्यात आली. दोघांचाही शोध घेऊनही त्यांचा शोध लागला नाही. नंतर, दोघांचेही विद्रूप मृतदेह प्रयागराजमधील शंकरगडच्या जंगलात आढळले. या प्रकरणात १२ साक्षीदारांची साक्ष घेण्यात आल्याचे सरकारी वकिलांनी सांगितले. यामध्ये सर्वात महत्त्वाचा साक्षीदार शिव हर्ष यांचे भाऊ शिव शंकर होते.
त्यांच्या माहितीवरून हे स्पष्ट झाले की, हा गुन्हा पूर्वनियोजित होता. यामध्ये अपहरण, दरोडा आणि खून यांचा समावेश होता. शिव शंकर सिंह यांनी त्यांच्या साक्षीत सांगितले की, त्यांनी हरचंदपुरमध्ये मनोज आणि रवीशी बोलणे झाले होते. त्यांनी आरोपीच्या घरातून जप्त झालेला मनोज यांचा तपकिरी रंगाचा कोटही ओळखला. राजा कोलंदर हा प्रयागराज येथील शंकरगड येथील रहिवासी आहे. त्याचे खरे नाव राम निरंजन कोल आहे. तो नैनी येथील सेंट्रल ऑर्डनन्स डेपो (सीओडी) चिवकी येथे कर्मचारी होता.


