Post Widget 1

Heath Tips

  • In enim justo, rhoncus ut, imperdiet a
  • Fringilla vel, aliquet nec, vulputateDonec pede justo,  eget, arcu. In enim justo, rhoncus ut, imperdiet a, venenatis vitae, justo.Nullam dictum felis eu pede mollis pretium.

Post Widget 2

विश्वचषक फुटबॉल स्पर्धा आयोजकांसमोर अडचणींचा वाढता डोंगर

विश्वचषक फुटबॉल स्पर्धा आयोजकांसमोर अडचणींचा वाढता डोंगर

यंदाची विश्वचषक फुटबॉल २०२६ स्पर्धेच्या उलटगणतीस सुरुवात झाली असताना अमेरिका, मेक्सिको आणि कॅनडा या सह यजमानांसमोर अडचणींचा डोंगर वाढू लागला आहे. मेक्सिकोमधील एका यजमान शहरात सुरू असलेली स्थानिक गुन्हेगारी टोळ्यांची हिंसा (कार्टेल), अमेरिकेतील ‘फॅन फेस्टिव्हल्स’च्या योजनांमध्ये झालेली कपात आणि तिकीट दरांमध्ये झालेल्या भरघोस वाढीमुळे चाहत्यांकडून होणारी टीका यांसारख्या समस्यांचा सामना आयोजकांना यापूर्वीपासूनच करावा लागत आहे. अशात आता अमेरिकेने इस्रायलच्या साथीत इराणविरुद्ध पुकारलेल्या युद्धामुळे अडचणींचा भलामोठा प्रश्न आयोजकांसमोर उभा राहिला आहे.

स्पर्धेतील एक सहभागी संघ असलेल्या इराणचे अमेरिकेत दोन सामने होणार आहेत. मात्र, इराण संघ अमेरिकेत खेळण्याची शक्यता कमी असल्याचे बोलले जात आहे. कदाचित ते स्पर्धेतूनही माघार घेऊ शकतात. अर्थात, याबाबत अजून निर्णय झालेला नाही. क्रीडा स्पर्धांवर आंतरराष्ट्रीय राजकारणाचे सावट ही जुनीच समस्या आहे. यापूर्वी अखेरच्या २०२२ मध्ये कतारमध्ये झालेल्या स्पर्धेत कामगारांना मिळालेली वागणूक आणि समलिंगी समुदायाचे हक्क चर्चेत होते. रशियाने २०१८ मध्ये यजमानपद भूषवले तेव्हा क्रिमियाचे विलीनीकरण आणि ब्रिटनमधील हेरांना विष देण्याचे प्रकरण चर्चेत होते. ब्राझील (२०१४)आणि दक्षिण आफ्रिका (२०१०) या दोन स्पर्धेत गुन्हेगारी आणि सुरक्षेबाबत चिंता होती. आता २०२६ मधील विश्वचषक स्पर्धा देखिल अशाच राजकीय तणावाच्या छायेत खेळविली जाण्याची शक्यता नाकारता येत नाही.

यामुळे क्रीडा विश्वात सर्वाधिक लोकप्रिय असलेल्या या ‘ब्युटीफुल गेम’ची विश्वचषक स्पर्धा आता आयोजकांची कसोटी पाहणार आहे. जगातील अलौकिक फुटबॉल प्रतिभा असलेल्या खेळाडूंचा ९० मिनिटांची पदन्यास अनुभवण्यासाठी फुटबॉल चाहते सज्ज होत असताना आयोजक समस्यांचा डोंगर कसा सर करणार याकडे अधिक लक्ष लागून राहिले आहे. आयोजकांसमोर असलेल्या समस्यांचा हा आढावा..

इराण आणि अमेरिकेतील युद्धजन्य परिस्थिती:
सर्वात मोठा पेच हा इराणच्या सहभागाबाबत आहे. अमेरिकेच्या हल्ल्यात इराणचे सर्वोच्च नेते मारले गेल्यामुळे दोन्ही देशांत तणाव आहे. इराणचे सामने अमेरिकेतील शहरांमध्ये (इंग्लेवुड आणि सिएटल) होणार आहेत, पण इराणचा संघ तिथे खेळायला येईल का, याबाबत साशंकता आहे. त्यांच्या माघारीबाबतही अजून काहीच चित्र स्पष्ट झालेले नाही. पण, सकृत दर्शनी या युद्धाचा स्पर्धेवर परिणाम होणार यात शंका नाही.

मेक्सिकोमधील सक्रिय गुन्हेगारी टोळ्यांचा हिंसाचार:
मेक्सिकोमधील ग्वाडालजाराशहरात गुन्हेगारी टोळ्यांमधील अंतर्गत हिंसाचार चांगलाच फोफावला आहे. यातही अमली पदार्थांच्या टोळ्यांमधील (कार्टेल्स) हिंसाचार वाढला आहे. लष्करी कारवाईत एका टोळीचा म्होरक्या मारला गेल्याने तिथे अशांतता आहे. जरी फिफा आणि मेक्सिको सरकारने सुरक्षेची खात्री दिली असली, तरी चाहत्यांच्या मनात भीतीचे वातावरण आहे.

फॅन फेस्टिव्हल्सचा निधी आणि राजकारण:
अमेरिकेतील अनेक शहरांनी मोठ्या स्क्रिनवर सामने दाखवण्याचे नियोजन केले होते. यासाठी काही ठिकाणे (फॅन फेस्ट) निश्चित केली होती. मात्र, अमेरिकेतील सरकारी टाळेबंदी आणि निधीच्या अभावामुळे न्यूयॉर्क आणि मियामीसारखी शहरे हे कार्यक्रम रद्द करण्याच्या किंवा कमी करण्याच्या विचारात आहेत. त्यामुळे मैदानावर सामने पाहण्यापासून वंचित राहणाऱ्या चाहत्यांमध्ये यामुळे नाराजी निर्माण झाली आहे.

तिकिटांचा काळाबाजार आणि प्रचंड दर:
यावेळच्या विश्वचषक स्पर्धेच्या तिकिटांचे दर सामान्यांच्या आवाक्याबाहेर गेले आहेत. काही महत्वाच्या सामन्यांची तिकिटे ७ लाखांहून अधिक (८,६८० डॉलर्स) किमतीला विकली जात आहेत. फिफाने स्वस्त तिकिटे देण्याचे कबूल केले असले, तरी त्यांची संख्या अत्यंत कमी आहे. सहाजिकच प्रामाणिक फुटबॉल चाहत्यांना त्यामुळे मैदानावर उपस्थित राहून सामने पाहता येणार नाहीत.

फॉक्सबरो स्टेडिअमचा वाद:
विश्वचषक स्पर्धेतील काही सामने बोस्टनजवळील फॉक्सबरो मैदानावर आयोजित केले जाणार आहेत. मात्र, येथील स्थानिक प्रशासनाने सामना आयोजित करण्यासाठी अद्याप मंजुरी दिलेली नाही. त्यांनी सुमारे ६५ कोटी रुपयांची (७.८ दशलक्ष डॉलर्स) मागणी केली आहे. यामुळे येथिल नियोजित सात सामन्यांवर टांगती तलवार आहे.

कडेकोट सुरक्षा नियम
एकूणच स्पर्धा यशस्वी आणि विनासायास पार पडण्यासाठी आयोजकांनी सुरक्षेचे कडक नियम लागू केले आहेत. प्रेक्षकांना स्टेडिअममध्ये प्रवेश करण्यापूर्वी अनेक टप्प्यांवर सुरक्षा तपासणीतून जावे लागेल. यात मेटल डिटेक्टर्स, एक्स-रे स्कॅनर्स आणि बायोमेट्रिक तंत्रज्ञानाचा वापर केला जाऊ शकतो. सिएटलसह अनेक शहरांमध्ये पारदर्शक पिशव्या वापरण्याचे बंधन असेल, जेणेकरून तपासणी जलद आणि अचूक होईल. प्रतिबंधित वस्तू: फटाके, पायरोटेक्निक्स आणि इतर धोकादायक वस्तू नेण्यावर पूर्णपणे बंदी असेल.

गर्दीच्या ठिकाणी संशयास्पद हालचाली शोधण्यासाठी कृत्रिम बुद्धिमत्तेवर (एआय) आधारित सीसीटीव्ही कॅमेरे आणि फेशियल रेकग्नायझेशन (Facial Recognition) सॉफ्टवेअर वापरले जाईल. बेकायदेशीर ड्रोन हल्ले रोखण्यासाठी विशेष काउंटर-ड्रोन सिस्टीम बसवण्यात आली आहे, विशेषतः मेक्सिकोमध्ये जिथे गुन्हेगारी टोळ्या ड्रोनचा वापर करतात.

मेक्सिकोसाठी विशेष सुरक्षा
मेक्सिकोमधील ग्वाडालजारा आणि इतर शहरांमध्ये लष्करी आणि राष्ट्रीय गार्ड तैनात केले जाणार आहेत. अतीशीघ्र कृती दलही कार्यरत राहणार आहे. पर्यटकांसाठी आणि खेळाडूंसाठी हॉटेल्सपासून स्टेडिअमपर्यंत सुरक्षित कॉरिडॉर तयार केले जातील. अमेरिकेने या स्पर्धेला ‘स्पेशल इव्हेंट असेसमेंट रेटिंग’ (SEAR) अंतर्गत उच्च दर्जाची सुरक्षा श्रेणी दिली आहे, ज्यामुळे फेडरल एजन्सी (FBI, DHS) थेट सुरक्षेत सहभागी होतील. सामना पाहण्यासाठी येणाऱ्या चाहत्यांनी अधिकृत व्हिसा आणि पासपोर्ट सोबत ठेवणे अनिवार्य आहे. मेक्सिकोसाठी वेगळ्या व्हिसा प्रक्रियेचे नियम पाळावे लागतील.

अशा सगळ्या सुरक्षा सोपस्कारातून जाऊन वेळेवर सामना पाहण्यासाठी प्रवेश करण्यासाठी चाहत्यांनी सुरक्षेसाठी लागणारा वेळ लक्षात घेऊन लवकरात लवकर मैदानावर पोहचण्याचे नियोजन करावे लागणार आहे.

Bookmark (0)
Please login to bookmark Close
Yogesh Kangude

टीम महाराष्ट्र जागरण

महाराष्ट्र जागरण" हे एक मराठी वृत्तपत्र आहे जे महाराष्ट्रातील ताज्या घडामोडी, राजकारण, समाजकारण, मनोरंजन, खेळ, व्यापार आणि इतर महत्त्वाच्या घटनांची माहिती पुरवते. हे वृत्तपत्र लोकांपर्यंत महत्त्वाची बातमी पोहोचवण्याचे कार्य करते आणि महाराष्ट्रातील वाचक वर्गात लोकप्रिय आहे. महाराष्ट्र जागरण हे विविध सामाजिक, आर्थिक आणि सांस्कृतिक घटकांवर लक्ष केंद्रित करते आणि त्याच्या माध्यमातून वाचकांना आपल्या अधिकारांची जाणीव करून देण्याचे, समाजातील सुधारणा साधण्याचे आणि सकारात्मक विचारांची पेरणी करण्याचे काम करते. या वृत्तपत्राची वाचनाची पद्धत लोकांसोबत संवाद साधून आणि त्यांना ताज्या घटनांबद्दल जागरूक ठेवून केली जाते. "महाराष्ट्र जागरण" ची ओळख त्यांच्या गंभीर पत्रकारिते, वाचकांची विश्वासार्हता आणि विविध राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय विषयांवर आधारित विश्लेषणात्मक दृष्टिकोनामुळे आहे.

संबंधित लेख

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

हे देखील वाचा x

error: Content is protected !!