मुंबई : भाजपच्या कथित ‘ऑपरेशन लोटस’मुळे एकनाथ शिंदे गटात प्रचंड अस्वस्थता निर्माण झाली आहे. दिल्लीत खुद्द उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गृहमंत्री अमित शाह यांच्याकडे भाजप नेते तथा प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्याविरोधात गंभीर तक्रारी नोंदवल्या. मात्र त्याचवेळी रत्नागिरीत शिंदेसेनेचे बलस्थान असलेले मंत्री उदय सामंत यांनी सार्वजनिक सभेत चव्हाण यांचे तोंडभरून कौतुक केले आणि “चव्हाण जगात भारी” अशी जाहीर पावती दिली.
याच पार्श्वभूमीवर ठाकरे गटाने मोठा दावा करत खळबळ उडवून दिली आहे. उद्धव ठाकरे गटाच्या एका नेत्याने थेट आरोप केला की, “उदय सामंत हे शिंदेसेना फोडणार आहेत.” सामंत यांनी मात्र हा आरोप विनोदीपणे हाणून पाडला.
दरम्यान, भाजपने विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीकडून पराभूत झालेल्या अनेक बड्या नेत्यांना पक्षात घेतल्याने शिंदे गटातील मंत्री आणि आमदारांची डोकेदुखी वाढली आहे. यात खालील नावे आघाडीवर आहेत.
– शंभूराज देसाई (सातारा) vs सत्यजित पाटणकर (भाजपात प्रवेश)
– भरत गोगावले (रायगड) vs स्नेहल जगताप (राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटात प्रवेश)
– दादा भुसे (मालेगाव) vs अद्वय हिरे (भाजपात प्रवेश)
– संजय शिरसाट (औरंगाबाद पूर्व) vs राजू शिंदे (भाजपात प्रवेश)
विशेषतः औरंगाबादमध्ये भाजपात आलेले राजू शिंदे यांनी “शिंदेसेना औरंगाबादमध्ये संपवू” असा निर्धारच बोलून दाखवला आहे.
साडे तीन वर्षांपूर्वी शिवसेनेतून बंड करून एकनाथ शिंदे यांनी पक्ष फोडला होता. आता भाजपच्या दबावामुळे शिंदे गटालाच ‘ऑपरेशन लोटस’चा फटका बसत असल्याने उदय सामंत यांच्या रूपाने तिसरी शिवसेना निर्माण होणार का, की शिंदे यशस्वीपणे भाजपला रोखणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.


