जळगाव: जळगावमध्ये रेल्वेने काही प्रवाशांना उडवल्याची घटना समोर आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, पुष्पक एक्स्प्रेसमधून प्रवास करणाऱ्या काही प्रवाशांनी आग लागली असल्याच्या भीतीने ट्रेनमधून खाली उड्या मारल्या. परंतु, याच वेळी समोरुन येणाऱ्या बंगळुरु एक्स्प्रेसने या प्रवाशांना उडवले आहे. या घटनेबाबत प्रत्यक्षदर्शी प्रवाशी संदीप जाधव माहिती दिली आहे.
प्रत्यक्षदर्शीने सांगितले की, पुष्पक एक्स्प्रेस जळगाववरुन आली होती. तेवढ्यात कुणीतरी म्हटले की, गाडीला आग लागली. आग लागली म्हटल्यावर लोकांनी खाली उड्या मारल्या. त्याचवेळी समोर बंगळुरुहून येणारी दुसरी गाडी होती, त्या गाडीखाली लोक चिरडले गेले आहेत. नेमके किती लोक चिरडले गेले हे माहीत नाही. परंतु, ब्रेक दाबल्यावर ज्या ठिणग्या उडाल्या, त्यामुळे स्लीपर डब्यातल्या लोकांना आग लागली असे वाटले, त्यानंतर त्यांनी उड्या मारल्या. किती लोक जखमी झाले आहेत? किंवा किती लोक दगावले आहेत ते समजू अद्याप समजू शकले नाही, अशी माहिती प्रवासी संदीप जाधव यांनी दिली.
जिल्हाधिकाऱ्यांनी काय सांगितलं?
पाच ते सहा प्रवासी आहेत, ज्यांना दुसऱ्या रेल्वेने उडवले आहे. या दुर्घटनेच्या ठिकाणी मदत आणि बचावकार्य सुरु करण्यात आले आहे. सात ते आठ प्रवाशांचा मृत्यू झाल्याचे समजतं आहे, असं जिल्हाधिकाऱ्यांनी म्हटलं आहे. जखमींना आम्ही तातडीने ग्रामीण रुग्णालयासह एकूण तीन रुग्णालयांमध्ये दाखल करत असल्याची माहिती जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी ही माहिती दिली.
नेमकी काय घटना कशी घडली?
जळगावहून पुष्पक एक्सप्रेस निघाली होती, परधाडे या स्थानकाजवळ ट्रेन आली असता ब्रेक दाबल्यानंतर घर्षण झालं आणि काही ठिणग्या उडाल्या. या पाहून एका प्रवाशाने आग लागली, आग लागली असे सांगण्यास सुरुवात केली. त्यामुळे एक्सप्रेसमधील ३५ ते ४० प्रवाशांनी ट्रेनमधून उड्या मारल्या. मात्र, नेमकं त्याचवेळी दुसऱ्या बाजूने येणाऱ्या बंगळुरु एक्सप्रेसने काही प्रवाशांना चिरडले. या अपघातात ७ ते ८ प्रवासी ठार झाल्याचा प्राथमिक अंदाज जळगावच्या जिल्हाधिकाऱ्यांनी वर्तवला आहे.
दरम्यान, जळगावमधील आरपीएफ जवान, रेल्वे पोलीस आणि रेल्वेचे अधिकारी देखील घटनास्थळी रवाना झाले आहेत. रेल्वे प्रशासन आता घटनास्थळी दाखल झाले असून घटनेचा पंचनामा व मदतकार्य सुरू करण्यात आले आहे. तर, जळगावच्या खासदार स्मिता वाघ याही घटनास्थळाकडे रवाना झाल्या असून त्यांनीही प्रशासनातील अधिकाऱ्यांशी फोनवरुन संपर्क साधत महत्वाच्या सूचना केल्या आहेत


