पुणे: पुणे शहरातील स्वारगेट बस स्थानकातील शिवशाही बसमध्ये एका तरूणीवर बलात्कार झाल्याच्या घटनेने राज्यभरात खळबळ माजली. अखेर या अत्याचार प्रकरणातील आरोपी दत्तात्रय गाडेला अटक करण्यात आली आहे. तब्बल 70 तासांच्या शोधमोहिमेनंतर सदर आरोपीच्या मुसक्या आवळण्यात आल्या आहेत. शिरूर तालुक्यातील गुनाट गावातून ग्रामस्थांच्या मदतीने, पोलिसांनी आरोपी गाडेला अटक केली आहे.
एका कॅनालमध्ये आरोपी गाडे हा लपून बसला होता. ड्रोन आणि डॉग स्क्वॉडच्या मदतीने आरोपीचा तपास सुरू होता. अखेर पोलिसांनी त्याला चारही बाजूने घेरले आणि बाहेर येण्याची सूचना दिली. 70 तासांच्या तपासानंतर पोलिसांनी गाडे याला अटक करत बेड्या ठोकल्या. सध्या आरोपीला लष्कर पोलीस ठाण्याच्या लॉकअपमध्ये आणून ठेवण्यात आले आहे. आज (दि. २८) पहाटे ससून रुग्णालयात त्याची वैद्यकीय तपासणी करण्यात आली. आता थोड्याच वेळात , त्याला कोर्टात हजर करण्यात येणार आहे.


