मुंबई : पत्रकारांशी झालेल्या वादानंतर टीकेचे धनी ठरलेले ईशान्य मुंबईचे खासदार संजय दिना पाटील यांनी अखेर जाहीरपणे दिलगिरी व्यक्त केली आहे. ठाकरे गटातून शिवसेना शिंदे गटात प्रवेश केल्यानंतर राजकीय प्रश्न विचारणाऱ्या पत्रकारांशी त्यांचा वाद झाला होता. या वेळी त्यांच्या तोंडून अपशब्द निघाल्याचा व्हिडिओ समोर आल्यानंतर मोठा वाद निर्माण झाला होता.
या प्रकरणानंतर संजय दिना पाटील यांनी माध्यमांसमोर भूमिका स्पष्ट करत, “माझ्यात आणि पत्रकारांमध्ये जो प्रकार घडला, त्याबद्दल मी मनापासून दिलगिरी व्यक्त करतो. माझ्याकडून जे बोलायला नको होते, ते बोलले गेले. त्यासाठी संपूर्ण पत्रकार बांधवांची मी माफी मागतो,” असे म्हटले.
संजय दिना पाटील म्हणाले की, शिंदे गटात प्रवेश केल्यापासून त्यांच्यावर सातत्याने टीका आणि शिवीगाळ होत आहे. स्वतःबद्दलची टीका सहन केली, मात्र कुटुंबीयांवरही वैयक्तिक पातळीवर टीका आणि अपशब्द वापरले जात असल्याने मानसिक त्रास होत असल्याचे त्यांनी सांगितले.
त्यांच्या म्हणण्यानुसार, पत्रकार परिषदेत त्यांनी संबंधित विषयावर प्रश्न विचारू नयेत, अशी हात जोडून विनंती केली होती. मात्र त्यानंतरही त्याच विषयावर वारंवार प्रश्न विचारण्यात आल्याने वातावरण तापले आणि वाद निर्माण झाला. याच गोंधळात त्यांच्या तोंडून अपशब्द निघाल्याचे त्यांनी मान्य केले.
“माझ्या राजकीय निर्णयावर टीका करा, पण माझ्या पत्नी, मुलगी, आई-वडील आणि कुटुंबीयांना या वादापासून दूर ठेवा,” अशी भावनिक विनंतीही त्यांनी केली. तसेच पुन्हा एकदा पत्रकार आणि संपूर्ण पत्रकार समूहाची मनापासून माफी मागत हा वाद इथेच संपवण्याचे आवाहन त्यांनी केले.


