मुंबई : सरपंच संतोष देशमुख प्रकरणात धनंजय मुंडे यांचा राजीनामा झाल्यानंतर महायुती सरकारमधील आणखी एका मंत्र्यावर आरोप झाल्याने खळबळ उडाली आहे. “मंत्री जयकुमार गोरे यांनी विकृतीचा कळस गाठला असून त्यांच्याविरोधात पुरावे समोर आले आहेत”, अशी टीका शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी केली.
सध्या महायुती सरकारच्या काळात राज्यातील ‘लाडक्या बहिणी’ सुरक्षित नसल्याची टीका विरोधकांनी केली आहे. तर याच प्रश्नावरून विधीमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात सरकारवर विरोधक तुटून पडताना दिसत आहेत. अशातच सरकारमधील मंत्र्यांचा विकृतीचा कळस समोर आल्याने ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी जोरदार हल्लाबोल केला आहे.
तसेच खासदार संजय राऊत यांना पत्रकारांनी गोरे यांचादेखील आता शिवसेना राजीनामा मागणार का? असा प्रश्न केला होता. यावर उत्तर देताना ते म्हणाले म्हणाले, “राजीनामा कसला मागता? अशा मंत्र्यांना लाथ मारून मंत्रिमंडळाबाहेर हाकले पाहिजे. हे मंत्री महिलांचा विनयभंग करणारे नेते आहेत. असे मंत्री तुमच्या मांडीला मांडी लावून बसणार असतील, तर बाहेर जाऊन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस कोणत्या तोंडाने महिलांवरील अत्याचाराविरोधात बोलणार आहेत?”
राऊत यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांच्यावर देखील निशाणा साधला असून गोरे यांच्यासारख्या मंत्र्यांना सोबत घेऊन महिला सबलीकरणावर आता कसे बोलणार असा प्रश्न केला आहे. फडणवीस हे आता लाडक्या बहिणींवर बोलणार का? हा प्रश्न आहे. सध्या प्रश्न नैतिकतेवरून विचारला जात असून विरोधीपक्ष म्हणून आम्ही आमचं पाहणार आहोत. पण, या प्रकरणावर सरकार आणि मुख्यमंत्री फडणवीस काय करत आहेत? याबाबत आता केंद्राकडे पत्र व्यवहार करणार असल्याचेही राऊत म्हणाले.


