Maharashtra Politics : महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा मोठ्या उलथापालथीची शक्यता वर्तवली जात असून नाना पटोले यांनी याबाबत धक्कादायक दावा केला आहे. नागपूरमध्ये माध्यमांशी बोलताना त्यांनी पुढील आठ दिवसांत राज्यात मोठा ‘राजकीय भूकंप’ होईल, असे संकेत दिले.
गेल्या काही वर्षांत राज्यात मोठे राजकीय बदल झाले. जून २०२२ मध्ये एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेना फुटली, तर जुलै २०२३ मध्ये अजित पवार यांच्या गटाने राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पाडत सत्तेत प्रवेश केला. त्यानंतर लोकसभा निवडणुकीपूर्वी अशोक चव्हाण यांच्यासह काँग्रेसमधील काही नेते भाजपमध्ये दाखल झाले.
याच पार्श्वभूमीवर बोलताना पटोले म्हणाले की, भाजपने आतापर्यंत मित्रपक्षांना कमकुवत करण्याचेच राजकारण केले आहे आणि आता पुन्हा तसाच डाव रचला जात आहे. आगामी काही दिवसांत ‘ऑपरेशन लोटस’ पूर्णत्वास जाईल, असा दावा त्यांनी केला.
दरम्यान, नवनीत राणा यांनीही यापूर्वी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेना आणि अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमधील अनेक नेते भाजपच्या संपर्कात असल्याचा दावा केला होता. त्यालाही पटोले यांनी दुजोरा दिला.
पटोले यांनी पुढे म्हटले की, जर हे घडले तर राज्यात भविष्यात फक्त भाजप आणि काँग्रेस असे दोनच प्रमुख पक्ष उरतील. तसेच, महाराष्ट्रातील जनतेला सध्याच्या राजकारणाचा कंटाळा आला असून त्यांना पुन्हा काँग्रेसचे सरकार हवे आहे, असा दावाही त्यांनी केला.
या विधानामुळे राज्यातील भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादी या पक्षांमध्ये अस्वस्थता वाढली असून पुढील काही दिवसांत नेमक्या कोणत्या राजकीय घडामोडी घडतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.


