Nanded Murder News Update : नांदेड शहरात गुन्हेगारीने डोके वर काढले असून गेल्या ४८ तासांत पाचव्या हत्येची धक्कादायक घटना समोर आली आहे. श्रीनगर परिसरात दिवसाढवळ्या एका तरुणावर धारदार शस्त्राने हल्ला करून त्याची हत्या करण्यात आली.
मृत तरुणाचे नाव सोनू कल्याणकर (वय ३५) असे असून तो शिवसेना पक्षाचा कार्यकर्ता होता. सकाळी सुमारे सहा वाजता तीन ते चार हल्लेखोरांनी त्याला रस्त्यात अडवून अनेक वार केले. या हल्ल्यात त्याचा जागीच मृत्यू झाला.
या हत्येमागचे कारण अद्याप स्पष्ट झाले नसून पोलिसांकडून तपास सुरू आहे. घटनेची माहिती मिळताच वरिष्ठ पोलीस अधिकारी घटनास्थळी दाखल झाले.
विशेष म्हणजे, तीन वर्षांपूर्वीही सोनू कल्याणकर याच्यावर जीवघेणा हल्ला झाला होता. त्या वेळी ‘रींदा’ गँगशी संबंधित गोलू मंगनाळे याने त्याच्यावर गोळीबार केल्याची माहिती आहे. सध्या तो आरोपी तुरुंगात असल्याचे सांगितले जाते.
दरम्यान, शुक्रवारी रात्री गँगवॉरमधून तीन जणांचा खून झाला होता. त्यानंतर शनिवारी मुरमुरा गल्ली परिसरात आणखी एका तरुणाची हत्या झाली आणि आता रविवारी सकाळी पुन्हा खून झाल्याने शहरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
सलग हत्यांच्या घटनांमुळे नांदेडमध्ये मध्ये कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न ऐरणीवर आला असून नागरिकांमध्ये मोठी भीती पसरली आहे.


