नवी दिल्ली: २२ मार्चपासून सुरू होणाऱ्या आयपीएलच्या १८व्या हंगामाअगोदर मुंबई इंडियन्सला जोरदार धक्का बसला आहे. कारण, मुख्य वेगवान गोलंदाज जसप्रित बुमराह पाठीच्या दुखापतीमधून अद्यापही सावरू शकला नाही. परिणामस्वरूप आयपीएलच्या सुरुवातीच्या काही सामन्यांत बुमराह खेळू शकणार नाही.
ऑस्ट्रेलिया दौऱ्यातील बॉर्डर- गावसकर करंडकमधील अंतिम व पाचव्या सिडनी कसोटीच्या दुसऱ्या दिवशी बुमराह जायबंदी झाला होता. यामुळे भारताच्या दुसऱ्या डावात तो गोलंदाजी करण्यासाठी उपलब्ध नव्हता. त्याच्या पाठीच्या दुखापतीने तोंडवर काढले होते. या दुखापतीमुळे तो जानेवारी महिन्यापासून क्रिकेटपासून दूर आहे. दुखापत गंभीर असल्यामुळे आयसीसी चॅम्पियन्स करंडक स्पर्धेलाही त्याला मुकावे लागले. चॅम्पियन्स करंडकच्या संभाव्य संघात त्याला स्थान देण्यात आले होते. मात्र, स्पर्धा सुरू होण्यापर्यंत तो दुखापतीमधून सावरणे कठीण दिसत होते. या कारणास्तव अखेरीस त्याचे नाव वगळण्यात आले होते.
बुमराह पुनरागमनांसाठी बंगळुरू येथील बीसीसीआय सेंटर ऑफ एक्सलन्समध्ये दाखल झाला आहे. दुखापतीमधून सावरण्याची त्याची पुर्नवसन प्रक्रिया वेगात सुरू आहे. मात्र, त्याला पूर्णपणे तंदुरुस्ती मिळवण्यासाठी आणखी काही वेळ द्यावा लागेल, असे बीसीसीआय सेंटर ऑफ एक्सलन्समधील फिजिओंनी सांगितले. बीसीसीआय सेंटर ऑफ एक्सलन्समधील फिजिओंनी त्याला स्पर्धात्मक क्रिकेटमध्ये परतण्यासाठी कोणताही विशिष्ट कालावधी निश्चित केलेला नाही, असेही कळते.
आयपीएलच्या सुरुवातीच्या टप्प्यात बुमसह खेळू न शकणे हा मुंबईसाठी मोठा धक्का आहे. त्याच्या अनुपस्थितीत, हार्दिक पंड्याच्या नेतृत्वाखालील मुंबईला वेगवान गोलंदाज ट्रेंट बोल्ट, कॉर्बिन बॉश आणि दीपक चहरवर मोठ्या प्रमाणात अवलंबून राहावे लागणार आहे.
मुंबई संघ २३ मार्च रोजी चेपॉकवर चेन्नईविरुद्ध आपल्या मोहिमेची सुरुवात करेल. २९ मार्च रोजी गुजरातचा सामना करण्यासाठी अहमदाबादला रवाना होईल. यानंतर, ३१ मार्च रोजी वानखेडेवर कोलकाताशी दोन हात करेल. ४ एप्रिल रोजी लखनौ आणि ७ एप्रिल रोजी बंगळुरू या संघांविरुद्ध त्यांचे सामने निश्चित आहे. एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात बुमराह मुंबईच्या चमूत दाखल झाला तरी, हे सर्व सामने खेळण्याची शक्यता फारच कमी आहे.


