पुणे: हिंजवडी फेज वनमध्ये आज (दि. १९) सकाळी भीषण अपघात घडला आहे. व्योमा ग्राफिक्स कंपनीच्या बारा कर्मचाऱ्यांना घेऊन जाणाऱ्या टेम्पो ट्रॅव्हलरला अचानक आग लागली. या अपघातात चार कर्मचाऱ्यांचा होरपळून मृत्यू झाला असून दोघांची प्रकृती चिंताजनक आहे. तर, इतर जखमींवर एका खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, सकाळी सुमारे आठ वाजता टेम्पो ट्रॅव्हलरला हिंजवडी फेज वनमध्ये निघाली असताना चालकाच्या पायाखाली अचानक आग लागली. ही बाब लक्षात आल्यानंतर चालक आणि समोरच्या सीटवरील कर्मचारी गाडीतून तात्काळ बाहेर पडले. मात्र, मागील दरवाजा उघडता न आल्याने मागच्या सीटवर बसलेल्या चार कर्मचाऱ्यांना गाडीतून बाहेर पडता आले नाही. त्यांचा या आगीत होरपळून मृत्यू झाला.
हिंजवडी पोलिस घटनास्थळी दाखल झाले असून त्यांनी तपास सुरू केला आहे. प्राथमिक अंदाजानुसार, टेम्पो ट्रॅव्हलरच्या इंजिनमध्ये तांत्रिक बिघाड झाल्याने आग लागली असावी. तसेच, गाडीच्या मागील दरवाज्याच्या यंत्रणेत काही दोष होता का, याचाही तपास सुरू आहे.


