उन्हाळा आणि पावसाळ्याच्या आगमनाबरोबरच डासांचा धोका झपाट्याने वाढतो आणि त्यासोबतच मलेरियासारख्या आजारांची भीतीही सतावू लागते. त्यात गर्भवती महिलांनी काळजी घेणे गरजेचे असते. वाढणाऱ्या बाळाची काळजी घेणे हा आईसाठी एक अनोखा आणि नाजूक अनुभव असतो. या काळात प्रत्येक आई आपल्या बाळाला सर्व धोक्यांपासून वाचवू इच्छिते आणि त्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करते.
मलेरिया हा आजार सामान्य लोकांसाठी जितका धोकादायक आहे, तितकाच तो गर्भवती महिलांसाठी अधिक गंभीर ठरू शकतो. गरोदरपणात शरीराची रोगप्रतिकारशक्ती थोडी कमकुवत होते, ज्यामुळे संसर्गाचा धोका वाढतो. या काळात मलेरिया झाल्यास, तो आई आणि बाळ दोघांसाठीही हानिकारक ठरू शकतो. म्हणूनच डॉक्टर या काळात विशेष खबरदारी घेण्याचा सल्ला देतात. गरोदरपणात मलेरियाचा सर्वात मोठा धोका म्हणजे मुदतपूर्व प्रसूती.
तज्ञांच्या मते, गरोदरपणात होणाऱ्या मलेरियाला सामान्य ताप समजून त्याकडे कधीही दुर्लक्ष करू नये. हा आजार केवळ आईच्या आरोग्यालाच हानी पोहोचवत नाही, तर गर्भातील बाळाच्या विकासावरही थेट आणि प्रतिकूल परिणाम करतो. मलेरियाचा परजीवी शरीरातील रक्तावर परिणाम करतो, ज्यामुळे गर्भनाळेवर परिणाम होऊ शकतो. यामुळे बाळाला पुरेसे पोषण आणि ऑक्सिजन मिळण्यास अडथळा येतो.
आईसह बाळावरही होतो परिणाम…
मलेरिया केवळ बाळासाठीच नाही, तर आईच्या आरोग्यासाठीही धोकादायक आहे. गर्भवती महिलांनी त्यांना जाणवणाऱ्या कोणत्याही लक्षणांना कधीही कमी लेखू नये. यामध्ये तीव्र ताप, अशक्तपणा, डोकेदुखी आणि अंगदुखी यांचा समावेश असू शकतो. वेळेवर उपचार न केल्यास, यामुळे ॲनिमिया (रक्तक्षय) होऊ शकतो, ज्यामुळे रक्ताची कमतरता निर्माण होते.


