Vidhan Parishad Election : विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात उमेदवारीसाठी जोरदार हालचाली सुरू असून, एका जागेसाठी मोठी चुरस निर्माण झाली आहे. देवगिरी निवासस्थानी रात्री उशिरापर्यंत झालेल्या बैठकीत अनेक नावांवर चर्चा झाल्याची माहिती समोर आली आहे.
या बैठकीला सुनेत्रा पवार, पार्थ पवार, प्रफ्फुल पटेल, आणि सुनील तटकरे यांच्यासह पक्षातील वरिष्ठ नेते उपस्थित होते. विशेष म्हणजे, माजी खासदार संजय काकडे यांचे पुत्र विक्रम काकडे यांची उपस्थितीही चर्चेचा विषय ठरली. विक्रम काकडे हे पार्थ पवार यांचे बालपणीचे मित्र असल्याने त्यांच्या उमेदवारीची जोरदार चर्चा रंगली आहे. मात्र, पक्षात त्यांच्या नावाला विरोध असल्याचेही सांगितले जात आहे.
याशिवाय राजेंद्र जैन, सुरेश बिराजदार, उमेश पाटील, आणि झिशान सिद्दकी यांच्या नावांवरही विचारमंथन झाल्याची माहिती आहे. आज पुन्हा कोअर कमिटीची बैठक होणार असून, त्यात उमेदवाराच्या नावावर अंतिम शिक्कामोर्तब होण्याची शक्यता आहे. या बैठकीला दिलीप वळसे पाटील, धनंजय मुंडे, हसन मुश्रीफ यांसारखे वरिष्ठ नेतेही उपस्थित राहणार आहेत.
विधानसभेतील संख्याबळानुसार राष्ट्रवादीच्या वाट्याला केवळ एकच जागा येत असल्याने इच्छुकांची स्पर्धा अधिकच तीव्र झाली आहे. त्यामुळे अंतिम उमेदवारी कोणाला मिळणार, याकडे राज्याच्या राजकारणाचे लक्ष लागले आहे.


