Sanjay Shirsat : राज्यात वाढत्या महिलांवरील अत्याचारांच्या घटनांवरून सामाजिक न्याय मंत्री आणि शिवसेना नेते संजय शिरसाट यांनी पोलीस प्रशासनावर थेट निशाणा साधला आहे. राज्यात पोलिसांमध्ये अपेक्षित आक्रमकपणा दिसत नाही. गुन्हेगारांवर पोलिसांचा धाक निर्माण झाला पाहिजे, असे स्पष्ट वक्तव्य त्यांनी केले.
छत्रपती संभाजीनगर येथे माध्यमांशी बोलताना शिरसाट यांनी नाशिकमधील कथित धर्मांतर आणि लैंगिक अत्याचार प्रकरणावरही प्रतिक्रिया दिली. या प्रकरणातील मुख्य आरोपी निदा खान हिला उशिरा अटक झाल्याबद्दल त्यांनी प्रश्न उपस्थित करत, मार्चमध्ये घटना घडली, मग ती दीड-दोन महिने कुठे होती? असा सवाल केला.
यावेळी त्यांनी या प्रकरणामागे मोठे षडयंत्र असल्याचा दावा केला. निदा खान ही केवळ एक मोहरा असून तिच्यासोबत इतर काही जणांचाही सहभाग असू शकतो, असा आरोप त्यांनी केला. तसेच या प्रकरणाची एसआयटी चौकशी व्हावी, अशी मागणी आपण मुख्यमंत्र्यांकडे करणार असल्याचे त्यांनी सांगितले.
शिरसाट यांनी काही राजकीय नेत्यांच्या भूमिकेवरही प्रश्नचिन्ह उपस्थित करत संबंधित सर्वांची सखोल चौकशी होण्याची गरज व्यक्त केली.
महिलांवरील अत्याचारांच्या घटनांबाबत बोलताना त्यांनी पोलीस प्रशासनाला अधिक कठोर भूमिका घेण्याचे आवाहन केले. गुंड आणि गुन्हेगारांमध्ये पोलिसांची भीती निर्माण झाली पाहिजे. गंभीर गुन्ह्यांमध्ये तातडीने आणि ठोस कारवाई होणे गरजेचे आहे, असे ते म्हणाले.
मुंबईतील महायुतीतील समन्वयाबाबत बोलताना शिरसाट म्हणाले की, युतीतील सर्व घटकांनी एकत्रितपणे काम केले पाहिजे. वेगवेगळे दौरे आणि स्वतंत्र हालचालींमुळे गैरसमज निर्माण होऊ शकतात. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री याची दखल घेतील, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.


