NCRB Report 2024: देशातील महानगरांमध्ये महिला सुरक्षित आहेत का? या प्रश्नाचे उत्तर पुन्हा एकदा नकारात्मक येताना दिसत आहे. नॅशनल क्राईम रेकॉर्ड ब्युरोच्या (NCRB) ताज्या आकडेवारीनुसार, २० लाखांहून अधिक लोकसंख्या असलेल्या १९ प्रमुख शहरांच्या यादीत महिलांवरील अत्याचारात मुंबई आणि पुणे ही दोन्ही शहरे पहिल्या पाचमध्ये आहेत. दिल्ली या यादीत पहिल्या क्रमांकावर असून जयपूर दुसऱ्या स्थानावर आहे.
पुण्याची स्थिती: गुन्ह्यांत घट, पण चिंता कायम
पुणे शहरात २०२४ मध्ये लैंगिक अत्याचाराच्या २४४ गुन्ह्यांची नोंद झाली आहे. २०२३ च्या तुलनेत गुन्ह्यांचे प्रमाण १.६ टक्क्यांनी घटले असले, तरी पुण्याचा क्रमांक देशात पाचवा लागल्याने शहराच्या प्रतिमेला तडा गेला आहे. विशेषतः कौटुंबिक हिंसाचार आणि अपहरण यांसारख्या घटनांचे प्रमाण सर्वाधिक आहे.
गुन्ह्यांचे स्वरूप आणि धक्कादायक आकडेवारी
अहवालानुसार, महिलांवरील अन्यायाचे स्वरूप खालीलप्रमाणे आहे:
- घरगुती हिंसाचार: पती किंवा नातेवाईकांकडून होणारा छळ (१४,३७६ घटना).
- अपहरण: महिला आणि मुलींना पळवून नेणे (१०,१४२ गुन्हे).
- पोक्सो (POCSO): बाल लैंगिक अत्याचार (७,५०८ गुन्हे).
- विनयभंग: विनयभंगाच्या उद्देशाने केलेले हल्ले (४,६७१ गुन्हे).
या घटनांनी हादरले महाराष्ट्र
पुण्यातील गुन्हेगारीच्या आकडेवारीला काही काळोख्या घटनांची पार्श्वभूमी आहे. बोपदेव घाट परिसरात झालेला सामूहिक बलात्कार आणि त्यानंतर २०२५ मध्ये स्वारगेट एसटी स्थानकासारख्या गजबजलेल्या ठिकाणी बसमध्ये झालेला बलात्कार, या घटनांनी सुरक्षा व्यवस्थेच्या चिंधड्या उडवल्या होत्या. निर्जन स्थळांवरील गस्त आणि सार्वजनिक ठिकाणची सुरक्षा यावर आता मोठे प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे. महाराष्ट्रातील मुंबई, पुणे आणि नागपूर या तीन मोठ्या शहरांचा समावेश देशातील सर्वाधिक गुन्हेगारी असलेल्या पहिल्या १० शहरांत झाल्याने, महिलांच्या सुरक्षिततेसाठी केवळ कायदे पुरेसे नसून कठोर अंमलबजावणीची गरज असल्याचे मत तज्ज्ञांकडून व्यक्त केले जात आहे.


