Sunetra Pawar: महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या ‘भावी मुख्यमंत्री’ पदाच्या चर्चांना उधाण आले असून, यावेळी बारामतीकरांच्या नजरा सुनेत्रा पवार यांच्याकडे वळल्या आहेत. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पत्नी आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या सुनेत्रा पवार यांना २०२९ मध्ये राज्याच्या पहिल्या महिला मुख्यमंत्री म्हणून पाहण्याची इच्छा त्यांचे पुत्र जय पवार यांनी व्यक्त केली आहे. या विधानानंतर बारामती शहरात लागलेल्या एका विशेष फ्लेक्सने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे.
फ्लेक्सवर काय लिहिलंय?
बारामती शहराच्या मध्यवर्ती भागात राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी लावलेल्या या फ्लेक्सवर “माननीय सुनेत्रा वहिनी अजितदादा पवार… होय मुख्यमंत्रीच! महाराष्ट्राच्या पहिल्या महिला मुख्यमंत्री म्हणून उभा महाराष्ट्र तुमच्याकडे पाहतोय,” असा मजकूर आहे. या फ्लेक्समुळे राजकीय वर्तुळात नव्या समीकरणांची चर्चा सुरू झाली असून, सुनेत्रा पवार यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेस २०२९ साठी आतापासूनच मोर्चेबांधणी करत असल्याचे दिसून येत आहे.
जय पवारांच्या विधानाने खळबळ
नुकत्याच झालेल्या पोटनिवडणुकीत सुनेत्रा पवार यांना मिळालेल्या मोठ्या मताधिक्यानंतर जय पवार यांनी माध्यमांशी संवाद साधला होता. ते म्हणाले, “बारामतीकरांची इच्छा नेहमीच अजितदादांना मुख्यमंत्री म्हणून पाहण्याची होती. आता वहिनी देखील त्याच ताकदीने आणि कष्टाने काम करत आहेत. त्यामुळे २०२९ च्या विधानसभा निवडणुकीनंतर त्या मोठी भूमिका बजावतील.” त्यांच्या या विधानामुळे राजकीय चर्चांना उधाण आलं आहे.
विरोधकांकडून ‘टोलेबाजी’
जय पवारांच्या या स्वप्नावर महायुतीमधील मित्रपक्षांच्या नेत्यांनी मिश्किल टीका केली आहे. भाजप मंत्री जयकुमार गोरे यांनी म्हटलं आहे की, “मुख्यमंत्री होण्यासाठी केवळ इच्छा असून चालत नाही, तर आमदारांचे संख्याबळ लागते.” तथापी, शिवसेना मंत्री भरत गोगावले यांनी म्हटलं आहे की, “पोटनिवडणुकीतील विजयामुळे जय पवारांना अशी स्वप्ने पडू लागली असावीत.”
नव्या समीकरणांची नांदी?
बारामतीमधील या फ्लेक्सबाजीकडे केवळ कार्यकर्त्यांचा उत्साह म्हणून पाहिले जात नाहीये. अजित पवारांनंतर आता सुनेत्रा पवार यांच्या नावाची मुख्यमंत्रिपदासाठी चर्चा होणे, हे आगामी काळातील मोठ्या राजकीय बदलाचे संकेत मानले जात आहेत. अद्याप यावर पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांनी कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया दिली नसली, तरी सोशल मीडियावर मात्र हा चर्चेचा सर्वात मोठा विषय ठरला आहे.


