Pune Crime: काळेवाडी परिसरात मध्यरात्री झालेल्या हल्ल्यात एका तरुणाचा जागीच मृत्यू झाला असून त्याचा भाऊ गंभीर जखमी झाला आहे. हमीद शेख असे मृत तरुणाचे नाव आहे. या प्रकरणी पोलिसांनी तत्काळ कारवाई करत अनिकेत सूर्यवंशी आणि विशाल सूर्यवंशी या दोन भावांना बेड्या ठोकल्या आहेत.
नेमकी घटना काय?
रविवारी रात्री उशिरा हमीद शेख आणि त्याचा मावसभाऊ अर्षद शेख यांच्यावर सूर्यवंशी बंधूंनी धारदार शस्त्राने हल्ला केला. या हल्ल्यात हमीदचा जागीच मृत्यू झाला, तर अर्षद सध्या मृत्यूशी झुंज देत आहे. पोलिसांनी वेगाने चक्र फिरवत मुख्य आरोपीसह त्याच्या फरार भावालाही अटक केली आहे.
पाच दिवसांपूर्वीच तुरुंगातून सुटका
या हत्येमागील पार्श्वभूमी अत्यंत धक्कादायक आहे. हमीद शेख याने 4 महिन्यांपूर्वी एका तरुणीवर एकतर्फी प्रेमातून जीवघेणा हल्ला केला होता. या गुन्ह्याखाली तो कारागृहात शिक्षा भोगत होता. अवघ्या 5 दिवसांपूर्वीच तो जामिनावर बाहेर आला होता. मात्र, त्याचे बाहेर येणे त्याच्या जीवावर बेतले.
हत्येचे ‘ते’ कारण आले समोर
पोलिसांनी दिलेल्या प्राथमिक माहितीनुसार, हमीद कारागृहातून सुटल्यानंतर संबंधित तरुणीच्या आईला मोठी भीती वाटत होती. हमीद पुन्हा आपल्या मुलीला त्रास देईल, अशी चिंता तरुणीच्या आईने आपल्या निकटवर्तीयांकडे (सूर्यवंशी बंधू) व्यक्त केली होती. याच भीतीने आणि जुन्या रागातून सूर्यवंशी बंधूंनी हमीदचा काटा काढण्याचे ठरवले असावे, असा संशय व्यक्त केला जात आहे. आरोपी आणि पीडित तरुणीचे कुटुंबीय एकमेकांचे जवळचे आहेत. तरुणीच्या आईने व्यक्त केलेली भीती आणि हमीदची गुन्हेगारी पार्श्वभूमी या दिशेने आमचा तपास सुरू आहे, असे पोलिसांनी स्पष्ट केले आहे. या घटनेमुळे परिसरात तणावाचे वातावरण असून काळेवाडी पोलिसांनी कडक बंदोबस्त तैनात केला आहे. जुन्या गुन्ह्याचा वचपा काढण्यासाठी झालेल्या या हत्येमुळे शहरात पुन्हा एकदा गुन्हेगारीच्या संघर्षाची चर्चा सुरू झाली आहे.


