Pimpri Chinchwad : पिंपरी-चिंचवड: शहरातील काळेवाडी परिसरात बुधवारी दुपारी एका ज्येष्ठ महिलेचा पाय रस्त्यालगतच्या उघड्या व्हॉल्वमध्ये अडकल्याने खळबळ उडाली. स्मिता भागवत कासारे (वय ६५) असे या महिलेचे नाव असून, तब्बल दोन तासांच्या शर्थीच्या प्रयत्नांनंतर त्यांची सुखरूप सुटका करण्यात आली. या घटनेमुळे महापालिकेच्या निष्काळजीपणाचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.
पाच फूट खोल खड्डा आणि अडकलेला पाय
दुपारी १२ च्या सुमारास स्मिता कासारे या परिसरातून पायी जात असताना, जमिनीच्या समांतर असलेल्या फायबरच्या उघड्या व्हॉल्वचा त्यांना अंदाज आला नाही. त्यांचा पाय थेट व्हॉल्वमध्ये गेला आणि गुडघ्यापर्यंत अडकला. स्थानिक नागरिकांनी त्यांना बाहेर काढण्याचा प्रयत्न केला, परंतु पाय निघत नसल्याने अखेर अग्निशमन दलाला पाचारण करण्यात आले.
असे राबवले बचावकार्य:
व्हॉल्व सुमारे ४ ते ५ फूट खोल असल्याने पाय काढणे मोठे आव्हान होते. पायाला कोणतीही इजा होऊ नये यासाठी जवानांनी व्हॉल्वच्या बाजूने काळजीपूर्वक खोदकाम केले. जवानांनी खोल खड्डा खणून तो पाईप बाहेर काढला आणि त्यानंतर कटरच्या साहाय्याने पाईप कापून महिलेची सुटका केली.
प्रशासकीय निष्काळजीपणावर संताप
सुमारे दोन तास चाललेल्या या थरारानंतर स्मिता कासारे बाहेर आल्यावर सर्वांनी सुटकेचा निश्वास सोडला. मात्र, शहरातील रस्त्यांवरील अशा उघड्या व्हॉल्वमुळे नागरिकांचा जीव धोक्यात येत असल्याने स्थानिक रहिवाशांनी संताप व्यक्त केला आहे. भविष्यात अशा दुर्घटना टाळण्यासाठी महापालिकेने त्वरित सर्व व्हॉल्ववर सुरक्षित झाकणे बसवावीत, अशी मागणी केली जात आहे.


